शेकापला जयंत पाटील यांनीच हद्दपार केले , म्हसळ्यातील प्रचार सभेत खा.सुनील तटकरेंचा घणाघात

माजी आमदार पंडित पाटील यांच्यावरही टिका

By Raigad Times    26-Apr-2024
Total Views |
mhasla
 
म्हसळा | शेकापक्षाला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे काम शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनीच केल्याचा आरोप रायगड लोकसभेचे राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे. वेळोवेळी भूमिका बदलल्यामुळे शेकापचे लोकसभा निवडणुकीतून नामोनिशाण संपुष्टात आले.
 
मोर्बा येथे झालेल्या सभेत त्यांनी आमच्या विरोधात बोलून तोंडसुख घेतले, पण सहा वेळा खासदारकी, केंद्रीय मंत्री राहिलेल्या अनंत गीतेंच्या कर्तबगारीची दखल कोणीही घेतली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.सुनील तटकरे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. बुधवारी म्हसळा पाभरे येथे त्यांच्या प्रचाराची सभा झाली.
 
यावेळी त्यांनी शेकाप आणि अनंत गीते यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. निवडणुका तोंडावर आल्या म्हणून इंडिया आघाडी पक्षांतील विरोधक केवळ विरोधाला विरोध करीत लोकांच्या भावना भडकवत आहेत.आज शेकापची जिल्ह्यातील अवस्था बिकट आहे.
 
शेकाप नेते जयंत पाटील यांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अलिबाग तालुयातून मला १७ हजारांचा लीड दिला होता. नंतरच्या काळात विधानसभा निवडणुकीत तो ३५ हजारांनी कमी झाला. या शंकेवरून आम्हाला दोष देता; अलिबागला तुमची ताकद जास्त की आमची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
  
शेतकरी कामगार पक्षाला हद्दपार करण्याचे खरे काम जयंत पाटील यांनीच केले आहे, म्हणून लोकसभेतील त्यांच्या पक्षाचे नामोनिशाण संपुष्टात आल्याचा थेट आरोप खासदार तटकरे यांनी केला. विकासकामांचा ठेका घेऊन अपूर्ण कामे ठेवून, शेकापचे माजी आमदार पंडित पाटील लोकांना त्रास देत आहेत, त्याचे पाप तुम्हाला आणखी भोगावे लागतील अशा शब्दात तटकरे यांनी पंडित पाटील यांच्यावरही तोफ डागली आहे.
 
श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार तथा मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत आणि मी सातत्याने पाठपुरावा करत फक्त म्हसळा तालुका सर्वांगीण विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आदिती तटकरे यांनी युती सरकारच्या माध्यमातुन महीला धोरण अवलंबिले आणि महिलांसाठी वेगवेगळ्या योजनाना प्राधान्य दिले आहे. सरकारच्या माध्यमातुन मतदारसंघात वीज पाणी रस्ते विकास केलाच पण आता रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे.
 
आम्ही सर्वधर्म समभाव जोपासणारे आहोत. आमची नाळ लोकांशी जुळली आहे. आघाडी प्रचार सभेत बाहेर गावाहून नेते येतात आणि आमच्या कर्तृत्ववार टिका करता; पण केवळ लोकांच्या मनात धूळफेक करण्याचे काम सुरू आहे. खासदार सुनिल तटकरे यांनी आयोजित प्रचार सभेत केंद्र सरकारने काश्मीर येथील ३७० कलम हटविण्याची भूमिका, स्थलांतरित लोकांना राष्ट्रीयत्व देण्याचा कायदा (एनसीआर) लागू करण्याचे सरकारचे धोरण स्पष्ट केले.
 
या सभेला माजी सभापती महादेव पाटील, तालुका अध्यक्ष समीर बनकर, मुंबई अध्यक्ष महेश शिर्के, संघटक जयंत चीबडे, सुनिल महाडीक, मनसेचे फैसल फोपेरे, माजी उप नगराध्यक्ष सुनिल शेडगे, युवक अध्यक्ष फैसल गीते,जमीर नजीरी, शहर अध्यक्ष रियाज घराडे, मजहर काझी, सेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, बीजेपी तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, महेश पाटील, मनसेचे सौरभ गोरेगावकर, राजेश तांबे, माजी सभापती छाया म्हात्रे, संदीप चाचले, महीला अध्यक्षा मिना टिंगरे, सोनल घोले, बिजीपी महीला अध्यक्षा रेखा धारिया, माजी जीप सदस्या हिरा बसवत, रेश्मा काणसे, किरण पालांडे, महेश घोले, अनिल बसवत, निलेश मांदाडकर, भाजप मुंबई प्रमुख मदन वाजे, नाना सावंत, प्रकाश गाणेकर, लहू म्हात्रे, लक्ष्मण कांबळे, मनोहर तांबे, भाजपचे युवा संघटक समीर धनसे, अकमल कादिरी, गाव निहाय सर्व सरपंच आदी मान्यवर पदाधिकारी पस्थित होते.