पेणमध्ये काविळ रुग्णांच्या संख्येत वाढ , अन्न आणि औषध प्रशासनाचे दुर्लक्ष; पेणकरांच्या आरोग्याशी खेळ

सरबताच्या गाड्या, टपर्‍यांवर अखाद्य बर्फाचा मोठ्या प्रमाणात वापर

By Raigad Times    25-Apr-2024
Total Views |
pen
 
पेण | उन्हाळाचा पारा वाढत आहे.रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ४० ते ४३ दरम्यान जात आहे. घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागत आहेत. यामुळे आपसूकच पावले रस्त्याच्याकडेला असलेल्या रसवंती गृह,ज्यूस सेंटर तसेच लिंबू सरबतच्या हात
गाड्या आणि टपर्‍यांकडे वळतात.
 
परंतु या पेयामध्ये सर्रासपणे वापरला जाणारा बर्फ खाण्यायोग्य आहे का? पेण शहरात अखाद्य बर्फाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून पेणकरांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू आहे. परिणामी, पेणमध्ये सध्या काविळच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
 
मागील वर्ष भरापासून या कारखान्याची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून केली नसल्याचे भयानक वास्तव तपासांती समोर आले आहे. दरम्यान, ‘अन्न आणि औषध प्रशासनाचे’ या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून अशुध्द पाण्यापासून बर्फाची निर्मिती रोखण्याचे केला जातो.
 
pen
 
या कारखान्यातून उद्योगासाठी वापरला जाणारा बर्फ तसेच खाण्यासाठी वापरला जाणार्‍या बर्फाचे उत्पादन होते.उद्योगासाठी लागणारा बर्फ हा दूध, मासे आणि रासायनिक उत्पादनांचे कूलिंग करण्यासाठी तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात. मग हाच बर्फ खाण्यासाठीही वापरला जातो.
 
असे असतानाही औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून विक्री होत आहे.‘कूलिंग’साठी वापरला जाणारा बर्फ हा खाद्यासाठी लागणार्‍या बर्फाच्या तुलनेत स्वस्त असतो. यामुळे रसवंतीगृह चालक असा स्वस्त बर्फ सर्रास वापरतात. येथील बर्फ बनवीणार्‍या कारखान्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाने आहेत.
 
परंतु, बर्फ मात्र अखाद्य स्वरूपाचा तयार केला जात असल्याचेही समोर आले आहे.खाण्यायोग्य बर्फ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे स्वच्छ शुद्ध असणे अपेक्षित असते. परंतु, दूषित व साठवून ठेवलेले पाणी बर्फ निर्मितीसाठी वापरले जाते. त्यात महत्वाची बाब म्हणजे सध्या पेण तालुयाला दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
 
त्यामुळे हे बर्फाचे कारखाने शुद्ध पाणी आणतात कुठून? हा प्रश्नच आहे. दूषित जंतूयुक्त पाण्यापासून बनलेला बर्फ पेणकरांच्या पोटात जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.केवळ रसवंतीगृहातच नव्हे तर सध्या जोरात सुरू असलेले विवाह सोहळे, सार्वजनिक अन्नदान, हातगाड्यांवरील बर्फगोळे, कुल्फी, आईस्क्रीम आदी ठिकाणी या बर्फाचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे पेण तालुयात सध्या कावीळ या आजाराच्या रुग्नाची संख्या कमालीची वाढली आहे.
साथीच्या आजारांना निमंत्रण
अस्वच्छ पाण्यापासून बनवलेला बर्फ खाण्यात गेल्यास घसादुखी,जुलाब, पोटाचे विकार, इन्फेशन होतात. दूषित पाण्यातील विषाणू बर्फातून थेट पोटात जातात. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. तसेच सध्या सगळीकडे लग्न सोहळे आणि हळदीचे मुहूर्त जोरात आहेत. या सोहळ्यांमध्ये तालुयातील उपस्थिती लावत आहेत.
 
या सोहळ्यांमधील शीतपेयांमध्ये सर्रास खाण्यालायक नसलेल्या बर्फाचा वापर होत आहे त्यामुळे पेणमध्ये काविळ या रोगाच्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे.
बर्फ नको, आईसयूब हवा...
‘आईसयूब’ हा खाण्यायोग्य बर्फ आहे. परंतु, हा महागडा बर्फ असल्याने याचा वापर मोठी हॉटेल, बीअरबार येथेच होतो. हा
आईसस्यूब बर्फ या हातगाड्यांवरही वापरण्यात यावा, अशी मागणी होत आहे. अखाद्य बर्फ बनविणार्‍या कंपन्या आपला बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो जास्त वेळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात.
 
त्यांच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते म्हणून तो अशुध्द असतो. काही रसवंतीगृहाच्या मालकांकडून असे समजते की, आईसयूब खाण्यालायक असला तरीही आम्हाला या बर्फाच्या प्रमाणाचा अंदाज नाही. त्यामुळे कधी कधी रसामध्ये तो बर्फ जास्त पडून रस पातळ होतो म्हणून आम्ही आईसयूब न वापरता बर्फाची लादी मागवून ती फोडून रसामध्ये टाकतो.
काय म्हणते अन्न आणि औषध प्रशासन.
अपुर्‍या मनुष्यबळाअभावी आम्ही बर्फ बनविणार्‍या कारखान्यांची तपासणी करू शकलो नाही. मागील वर्षभरात एकदाही या कारखान्यांची तपासणी अन्य आणि औषध प्रशासनाकडून केली गेली नाही. या कारखान्यांच्या मालकांनी बर्फ शुध्द पाण्यापासूनच बनविने बंधकारक आहे. तसेच स्वच्छ पद्धतीने बर्फाची वाहतूक करायला हवी.
 
विक्रेत्यांनी या कारखान्यांकडून बर्फ विकत घेताना तो खाण्याचा बर्फ आहे असे बिल घ्यायला हवे आणि कारखान्यांनीदेखील ते सक्तीने द्यायला हवे. बर्फ विकत घेणार्‍यांनी तो खाण्याचाच पाहिजे याचा हट्ट धरावा. सामान्य लोकांना हा बर्फ काचेसारखा चकाचक व पारदर्शक दिसतोय ना हे पाहायला हवे. तो नुसता जाडसर नको.
 
तसेच अखाद्य बर्फ हा निळा कलर टाकून विकायला पाहिजे.बर्फ तपासणीची लवकरच मोहीम सुरू केली जाणार आहे, असे रायगड अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मारुती घोसलवाड यांनी सांगितले.