सुनील तटकरेंनी घेतला अंतुलेंचा आधार ! बॅनरवर स्व.बॅ. अंतुलेंचा फोटो, राष्ट्रवादीत मुश्ताक अंतुलेंची एंट्री

By Raigad Times    23-Apr-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड राष्ट्रवादी-भाजप महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काँगे्रसचे नेते दिवंगत नेते बॅ.ए.आर. अंतुले यांचा आधार घेतल्याचे दिसत आहे. तटकरेच्या प्रचारसभांमध्ये बॅनरवर त्यांचा फोटो झळकत होताच; परंतू आता अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांना राष्ट्रवादीत घेऊन तटकरे यांनी अल्पसंख्यांक समाजाचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला आह सुनील तटकरे यांनी सुरुवातीला बॅ.ए.आर. अंतुले यांचा हात पकडून काही काळ रायगडचे राजकारण केले.
 
अंतुले यांना ते गुरुस्थानी मानत. तटकरेंवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. पुढे त्यांना याचा पश्चाताप झाला, हे वेगळे. दरम्यानच्या काळात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँगे्रसची स्थापना केली. अंतुलेसाहेंबांच्या पुढ्यात बसलेले तटकरे दुसर्‍या दिवशी शरद पवार यांना जाऊन भेटले. ‘शरद पवारांच्या मर्जीतले’ अशी ओळख तटकरेंची राज्यात निर्माण झाली होती. तटकरेंनी बोलावं आणि पवारांनी ते द्यावं, इतके घनिष्ठ संबंध त्यांच्यात होते.
 
या जोरावरच तटकरे यांनी, त्यांच्या घरातील प्रमुख सर्वांनाच चांगली पदं मिळवून दिली. मधल्या काळात राष्ट्रवादीचा एक गट (अजित पवार गट) भाजपसोबत सत्तेत जाऊन मिळाला. शरद पवार यांची साथ सोडणार्‍यांमध्ये सुनील तटकरे अग्रक्रमांकावर होते. भाजपसोबत बोलणी करण्यासाठी लगबग सर्वच चर्चांमध्ये अजित पवारांसोबत तटकरे असत. शरद पवारांना बाय बाय करुन आता सहा महिने उलटले आहेत.
 
alibag
लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. सुनील तटकरे राष्ट्रवादी-भाजप महायुतीकडून निवडणुकीसाठी उभे आहेत. अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारल्यामुळे तटकरेंना या निवडणुकीत बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावता येत नाही. नावाचाही उल्लेख टाळावा लागला आहे. त्यातच तटकरेंच्या या नवीन भूमिकेमुळे रायगडमधील अल्पसंख्यांक समाजदेखील नाराज असल्याची चर्चा आहे.
 
ही नाराजी दुर करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. बॅ.ए.आर.अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी सोमवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास तटकरेंनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात व्यक्त केला. अल्पसंख्यांक समाजाची दिशाभूल केली जात आहे.
 
संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे तटकरे आपल्या सभेमधून सांगत आहेत.तटकरेंच्या सभांमधून बॅनरवर आता बॅ.ए.आर.अंतुले यांचे छायाचित्रदेखील दिसू लागले आहे. अंतुले साहेबांचे रायगडकरांच्या मनात मोठे स्थान आहे. खासकरुन अल्पसंख्यांक समाजाचा राग शांत करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.एकंदरीत अंतुले यांचा फोटो असो की जावई.
 
तटकरेंनी या लोकसभा निवडणुकीत अंतुले यांचा अधार घेतला असल्याचे पहायला मिळत आहे. स्व. बॅ.ए.आर. अंतुले हे त्यांच्या शेवटच्या काळात तटकरेंवर प्रंचड नाराज होते. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करणारे त्यांचे पूत्र नाविद अंतुले यांचा गेल्यावर्षी अकाली मृत्यू झाला. बॅ. अंतुले यांची पत्नीचे निधन होऊन महिनादेखील झालेला नाही. अशात त्यांचे जावई तटकरेंसोबत जाऊन मिळाल्याने याचा राजकीय फायदा तटकरेंना किती होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे