म्हसळा शहरातील जनतेच्या तोंडचे पाणी पळाले; महिलांमध्ये तीव्र संताप

By Raigad Times    22-Apr-2024
Total Views |
 mhasala
 
म्हसळा | १२ वर्षांपूर्वी म्हसळा तालुका टँकरमुक्त झाला. सद्यस्थितीत मात्र म्हसळा शहरातील जनतेच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र आहे. गेल्या ३० वर्षांत जिल्हा परिषद ग्रामीण पााणीपुरवठा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन अशा सर्व सुमारे १०० कोटींच्या योजना होऊनही म्हसळा शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने, महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी ४३ कोटी रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापूर्वी झालेल्या विविध योजनेंत प्रचंड भ्रष्टाचार आहे तर अनेक कामे निकृष्ट दर्जाची आहेत. कामे न करताच ठेकेदाराला बिले अदा केली आहेत.
 
mhasala
 
त्यामध्ये काही भागांत जलवाहिन्या, फिल्टरेशन प्लांट दुरुस्त करणे अशी कामे संबंधीत ठेकेदाराने न करताच बिले दिली आहेत. त्याचा फटका शहरातील लोकांना बसत आहे. दुसरीकडे, म्हसळा नगरपंचायतीने शहरांतील काही भागांत विंधण विहीरी खोदल्या असून त्यातून नागरिकाना पंपाव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये म्हसळा दिघी रोड, नवानगर परिसरांत ७ ते ८ ठिकाणी तर साने-दातार आळी आणि हरीजन वस्तींत एक ठिकाणी विंधण विहीरीमार्फत पाणीपुरवठा केला जातो.
 
त्यामुळे त्या भागातील नागरिकाना पाणीटंचाईपासून थोडा दिलासा मिळत आहे. भविष्यांत ब्राह्मण आळी, तांबट आळी, सोनार आळी, कन्या शाळा परिसर, उमरोटकर-बोरकर वस्ती, मातोश्री पार्क या परिसरांत किमान ७-८ विंधण विहीरी खोदून परिसरांत पर्यायी सोय करावी, अशी मागणी पुढे येत आहे. पाभरे येथून सुरु असलेल्या योजनेतील ३० हॉर्सपॉवरच्या दोनही पंपात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे म्हसळेकरांना केवळ एकवेळ अपुरे, गढूळ, पिण्यास आयोग्य असे पाणी मिळत आहे.
 
पाणी सोडणे आणि पंप देखभाल दुरुस्तीसाठी ठेका पद्धतीने काम दिले आहे. अटी नियमानुसार संबंधितांच्या अनास्थेमुळे आणि पंपाची पर्यायी सोय नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरांत अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई होत आसल्याने पाण्यासाठी महिला कधीही रस्त्यावर येऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे म्हसळा नगरपंचायतीच्या ७ विहीरी, खाजगी ६ विहिरी आणि शहरात ८७ खाजगी विंधण विहीरी पाणीटंचाईची तीव्रता कमी करीत आहेत.