रोहा ; धाटाव येथील सीईटीपी प्लांटला आग; काम ठप्प!

By Raigad Times    22-Apr-2024
Total Views |
 roha
 
धाटाव/ रोहा | रोहे तालुयातील धाटाव एमआयडीसीतील सामुदायिक जलशुद्धीकेंद्राजवळ रविवारी (२१ एप्रिल) भीषण आग लागली. आगीत जलशुद्धीकरण केंद्र निकामी झाले आहे. त्यामुळे सर्वच कंपन्यांचे उत्पादन व अन्य कामकाज ठप्प झाले असून, या कंपन्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
 
रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. जलशुद्धीकरण केंद्राच्या (सीईटीपी प्लांट) टाकीचे पाईप एचडीपी असल्याने त्यांनी तातडीने पेट घेतल्याने ते जळाले. या घटनेनंतर आकाशात धुराचे लोट पसरले होते. आग आटोयात आणण्यासाठी २ अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले.
 
त्यानंतर आग आटोयात आली. सीईटीपी प्लांट धाटाव एमआयडीसी अंतर्गत असून या प्लांटच्या देखभाल दुरुस्तीचे काम एका एजन्सीला दिले आहे. आग दुर्घटनेनंतर प्लांटमध्ये दूषित पाणी प्रक्रियेसाठी वाहतूक करणारे मुख्य पाईप जळाल्याने या भागातील रासायनिक कंपन्यांना आपापल्या कंपनीतील दूषित सांडपाणी जलशुद्धीकरण केंद्रात सोडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
 
या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र जलशुद्धीकरण केंद्राचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुरुस्तीचे काम होऊन लाईन पूर्ववत होत नाही तोपर्यंत एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक कंपन्यांचे उत्पादन बंद राहणार आहे. या घटनेनंतर सीईटीपीपेक्षा अन्य कंपन्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे.