मुश्ताक अंतुलेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश , तटकरेंचा इंडिया आघाडीला धक्का

मुश्ताक अंतुले हे माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांचे जावइ

By Raigad Times    22-Apr-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते बॅ. ए. आर. अंतुले यांचे जावई आणि काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले आज राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडून इंडिया आघाडीला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे आज (२२ एप्रिल) मुंबईतील गरवारे लबमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
 
अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये मुश्ताक अंतुले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुश्ताक अंतुले हे काँगे्रसचे आमदार राहिलेले आहेत. त्यांच्याकडे, स्व. बॅ. ए. आर. अंतुले यांचा राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात होते. मुश्ताक अंतुले हे काँग्रेसचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात.
 
गेल्या कित्येक वर्षांपासून ते काँग्रेसचे काम करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. मात्र त्यांनी अचानकपणे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
 
सोमवारी अजित पवारांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. मुंबईतील गरवारे लब येथे सकाळी ११ वाजता होणार्‍या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे हे उपस्थित राहतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.
 
सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अनंत गीते यांना उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीतील विजयासाठी तटकरे कंबर कसून प्रचार करत आहेत. आपली ताकद वाढावी, यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
यामध्ये शेकाप, शिवसेना (ठाकरे गट) आदी पक्षातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तटकरे शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत गेल्यामुळे अल्पसंख्यांक समाज नाराज आहे. अशावेळी मुश्ताक अंतुले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे रायगडमधील अल्पसंख्यांक मतदारांचा राग शांत होईल आणि त्याचा फायदा कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला होईल, अशी अपेक्षा आहे.