नवी मुंबईत बत्ती गुल, रायगडात लपंडाव ! लोडशेडींगची चर्चा , प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे हाल

By Raigad Times    18-Apr-2024
Total Views |
 navi mumbai
 
नवी मुंबई | एकीकडे उन्हाचा दाह वाढत असताना बुधवारी नवीमुंबईत बत्ती गुल झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाल्याचे पहायला मिळाले. महापारेषणच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात वीज गायब झाली होती. तर रायगड जिल्ह्यातील काही भागासह वारंवार विज खंडीत होण्याचे प्रकार सुरुच आहेत.
 
नवी मुंबईच्या परिसरात गेल्या काही तासांपासून वीज पुरवठा होत नाही. या भागात सध्या वीजेची मागणी मोठी आहे, त्यामध्ये ७५० मेगा वॅट वीज कमी पडताना दिसत आहे. मागणी आणि पुरवठ्याचं गणित बिघडल्याने, वीजेच्या मागणी वाढल्याने लोड आल्याने तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात येत आहे. ठाणे आणि नवी मुंबईत सध्या ४००० मेगा वॅटची मागणी आहे.
 
पण तेवढा पुरवठा होत नाही. पण अर्ध्या तासात हा वीज पुरवठा सुरळीत होईल असं महापारेषणकडून स्पष्ट करण्यात आले होते.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, कर्जत, श्रीवर्धन, महाड, मुरुड यासह ग्रामिण भागात वारंवार विज खंडीत केली जात आहे. नागरीक आधीच उकाळ्याने हैराण झोलेले असताना, विज खंडीत होत असल्याने संतापाचे वातावरण आहे.
 
हा भारनियमनाच आहे, मात्र लोकसभा निवडणूक असल्याने विज वितरण तसे सांगत नसल्याची चर्चा नागरीकांमध्ये आहे.
दरम्यान, रायगड, नवीमुंबई परिसरातचा पारा ४० अंशाच्या वर पोहचला आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढतोय, तर दुसरीकडे पुण्यासह मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
 
कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा चढण्याचा अंदाज आहे. मुंबईत तापमानाचा पारा पुन्हा चढता राहणार आहे. कोकण विभागात आर्द्रता आणि उष्णता यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तापमानाची जाणीव होईल. त्यामुळे मुंबईकरांना तसेच कोकण किनारपट्टीवर अधिक अस्वस्थता जाणवू शकेल.
 
या कालावधीमध्ये दीर्घकाळ उन्हात राहू नये असे प्रादेशिक हवामान विभागाने सुचवले आहे. तसेच पाणी पिणे, सुती कपडे परिधान करणे, डोयावर टोपी, छत्री घेण्याचे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी केले आहे.