पिण्याच्या पाण्यासाठी पेणकरांची धडपड ; तालुयात ५८ वाड्या, ६ गावांना टंचाईच्या तीव्र झळा

By Raigad Times    17-Apr-2024
Total Views |
 pen
 
पेण | ‘नेहमीच येतो उन्हाळा, पाणी मिळविण्यासाठी धावपळ करा’ अशी वेळ पेण तालुयातील टंचाईग्रस्त गावांवर दरवर्षी येत असते. तालुयात पाणीटंचाई काही वाड्यांची व गावांची पाठ काही सोडत नाही. तालुयामध्ये कासवछाप गतीने सुरु असलेल्या जलमिशन योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही जर आदिवासी वाड्या व गावांमध्ये पाणी मिळत नसेल, तर योजना कशासाठी? असा सवाल येथील ग्रामस्थ करत आहेत.
 
पेण तालुयातील अनेक ठिकाणी जलमिशन योजनेची कामे संथ गतीने सुरु आहेत. बर्‍याच ठिकाणी ही कामे अर्धवट अवस्थेत असल्याने तर कुठे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने अनेक ठिकाणी पाणी समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. पेण तालुयातील ६ गावे आणि ५८ वाड्यांना ५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
 
पेण पंचायत समिती प्रशासनाकडून यावर्षी मार्च ते जून महिन्यापर्यंत टंचाईग्रस्त गावांसाठी तब्बल २ कोटी १४ लाख ५० हजार रुपये खर्चाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ५४ गावे १९० वाड्यांचा समावेश आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल १ कोटी ८५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पाच नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी २९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे.
 
सद्यपरिस्थितीत ६ गावे ५८ वाड्यांवर फक्त ९ टँकरने मार्च महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू झाला असल्याचे पंचायत समिती पाणी पुरवठा टँकर सप्लाय विभागाचे कांबळे यांनी सांगितले. आराखड्यात समावेश असलेल्या गावे वाड्यावर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समिती प्रशासनाने कंबर कसली आहे. याकरिता प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडे अजून १० टँकरची मागणी करण्यात आली आहे.
 
पेण वाशी खारेपाट, वडखळ शिर्की मसद या विभागात टंचाईग्रस्त गावांची संख्या जास्त असल्याने टँकरने पाणीपुरवठा पाऊस पडेपर्यंत करावाच लागतो. पेण पंचायत समिती प्रशासनाकडून दरवर्षी १.५० कोटींच्यावर टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात येतो.
 
तो आता दोन कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला आहे. टंचाईग्रस्त गावांना नळाद्वारे शुध्द पाणीपुरवठा कधी होणार? याचा अंदाज लावता येत नाही. दोन दशके हा टंचाई कृती आराखडा बनवला जातो आणि टंचाई ग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो ही समस्या मार्गी कधी लागणार असे पेण खारेपाटातील जनतेला प्रश्न पडला आहे.
 
नवी मुंबईची तहान भागविणार्‍या पेणमधील हेटवणे धरणाचा मुबलक प्रमाणात पाणीसाठा असूनही सदोष वितरण व्यवस्थेअभावी पेण तालुयातील टंचाईग्रस्त गावांना टंचाई काळात टँकरद्वारेचपाणीपुरवठा करावा लागतो आहे. सद्यपरिस्थितीत मसद बुद्रुक बोर्झे, वाशी, वढाव, दिव, या खारेपाटण विभागातील ग्रामपंचायतीनी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा सुरू करण्याच्या प्रस्तावानुसार पेण तालुयातील ५८ वाड्या व ६ गाव या ग्रामपंचायत हद्दीतील गावे वाड्यावर टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे.
 
पेण पूर्व बाजूकडे जावळी, वाकरुळ, वरप, पाबळ ग्रामपंचायतींमधील डोंगर भागातील आदिवासी वाड्यावर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी ९ टँकर उपलब्ध झाले आहेत.
हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणात सोडायचे ही वाढीव उद्धव योजना सुरु करायची होती, परंतु अजून सुरू केलेली नाही.
अनेक भागात पाणी पुरवठा ५ दिवसांनंतर केला जात आहे. ही समस्या २५ ते ३० वर्षांपासून उद्भवत आहे. जर लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष दिले असते तर तालुयात पाणीटंचाई राहिलीच नसती. पेण खारेपाटचे पाणीप्रश्न सोडवण्याकडे लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षच होत आहे.- महेंद्र ठाकूर, माजी सरपंच, बोर्झे-पेण