कोणाच्या मदतीसाठी संजय राऊतांनी खिशात कधी हात घातला आहे का? डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवरचे आरोप बिनबुडाचे!

आ. भरत गोगावले यांचा सवाल ; मुद्दे नसल्यामुळेच बिनबुडाचे आरोप

By Raigad Times    17-Apr-2024
Total Views |
mahad
 
महाड | संजय राऊत यांनी आजवर कधी कुणाला मदत करण्यासाठी स्वतःच्या खिशात हात घातला आहे का? असा सवाल शिवसेनेचे (शिंदे गट) प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी केला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर केलेले भ्रष्टाचार व अनियमिततेचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते असा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे.
 
आ. महाड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला सर्वात जवळून ओळखणारे आपण असून महाडमध्ये ज्यावेळेस तारीक गार्डन इमारत दुर्घटना घडली त्यावेळेस या दुर्घटनेत निराधार झालेल्या मोहम्मद बांगी व अहमद शेखनाग या दोन मुलांचे पालकत्व स्विकारून त्यांच्या नावे १० लाखाची फिस डिपॉझीट ठेवण्यात आले होते.याखेरीज १८ वयोगटातील हदयात होल असणार्‍या सुमारे साडे चार हजार बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे असे सांगितले. याखेरीज मुख्यमंत्री शिंदे यांच्या मातोश्री गंगुबाई यांच्या नावाने सुरु केलेले हॉस्पिटल व स्व.आनंद दिघे यांच्या नावाचे हॉस्पिटल मधून हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.
संजय राऊत यांनी आजवर कधी कुणाला मदत करण्यासाठी स्वतःच्या खिशात हात घातला आहे का? असा सवाल करीत
शिंदे पिता पुत्रांना बदनाम करण्यासाठीच असे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे गोगावले यांनी सांगितले. डॉ.श्रीकांत
शिंदे फाऊंडेशनमध्ये एकाही रुपयाचीही अनियमितता नसून फाऊंडेशनच्या स्थापनेपासूनचा हिशेब सादर केला जाईल, असे
गोगावले यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, एनडीएकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पंतप्रधान म्हणून आहे मात्र विरोधकांना म्हणजे इंडिया आघाडीला आपल्या पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करता आला नाही. त्यामुळे राज्यात महायुतीला चांगले वातावरण असून ज्या ४ ते ५ जागा वाटपाबाबत संभ्रम आहे तोही येत्या एक दोन दिवसांत संपेल, असा विश्वास व्यक्त करीत रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांना महाड मतदार संघातून ४० हजारांपेक्षा जास्त मताधिय देऊ, असे गोगावले यांनी सांगितले.