धाटाव येथील कोरस कंपनीत स्लॅब पडून चार कामगार जखमी, एक गंभीर

By Raigad Times    17-Apr-2024
Total Views |
roha
 
रोहा | सरक्षतेच्या बाबतीत नेहमीच हलगर्जीपणा करणाऱ्या धाटाव एमआयडीसी तील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीत शनिवारी दुपारी इलेक्ट्रिक प्लांट मध्ये कमकुवत इमारतीचा स्लॅब पडून घडलेल्या घटनेत ४ कामगार जखमी झाले असून त्यात एका कामगार गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या घटनेमुळे कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. धाटाव एमआयडीसीतील बहूचर्चित कोरस इंडिया कंपनीतील अनेक भागातील इमारती कमकुवत असून त्यांची वर्षानुवर्षे केवळ थातूरमातुर मलमपट्टी केली जात आहे.शनिवारी दुपारी कंपनीतील एल. टी. रूम ( वीज पुरवठा केंद्र) येथील कार्यालयात काही कामगार काम करीत असताना मयूर खरीवले ( भातसई ), विवेक निळकर ( इलेक्ट्रिक इंजिनियर - कोलाड ), समीर म्हेसकर ( अष्टमी ), रुपेश सुतार ( मेढे ) या चार कामगारांच्या डोक्यावर, पाठीवर व हातावर आर. सी. सी.स्लॅबचा भाग कोसल्याने घडलेल्या अपघातात चारही कामगार जखमी झाले आहेत.
 
यात मयूर खरीवले या कामगाराच्या उजव्या हाताचे बोटं कट झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या जखमी कामगारांवार वरसे येथील डॉ. गोसावी हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले तर मयूर खरीवले याला तातडीने पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
दरम्यान, या कंपनीतील घातक केमिकलची निर्मिती होत असल्याने इमारती मुदतीत कमकुवत होत आहेत. या कमकुवत इमारती पाडून नवीन इमारती बांधकाम होणे गरजेचे असताना केवळ ठेकेदारांना खुश करण्यासाठी या इमारतीची फक्त मलमपट्टी करून लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या कामात कंपनीतील काही अधिकारी वर्ग देखील जबाबदार असून या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे..