नेरळ येथे वीज वाहिनीला धडकून मोराचा मृत्यू

By Raigad Times    17-Apr-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत | नेरळ येथील हुतात्मा चौक परिसरात फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी भागात मोठ्या प्रमाणात मोरांचा संचार असतो. त्यातील एका मोराचा वीज वाहिनीला धडक लागल्याने मृत्यू झाला. मृत झालेला पक्षी हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्या पक्षावर शासकीय नियमानुसार अंतिम विधी केले जाणार आहेत.फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी परिसरात मोठ्या संख्येने मोरांचा निवास आहे.
 
या भागातील मोर हे मानवी वस्तीत नेरळ गावात अनेकदा फिरताना दिसतात. टेप आळी, मोडक नगर आणि चिंच आळी भागात मोर बागडताना दिसत असतात. मानवी वस्तीतही मोरांचा वावर सुरक्षीत असल्याने असंख्य मोर अनेक वर्षे वस्ती करून आहेत.
 
मंगळवारी, १६ एप्रिल रोजी सकाळी. ८ वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट टेकडी येथून एक मोर मोरोशी भागाकडे जात असताना तेथून वाहणार्‍या कंपनीच्या वीज वाहक तारा यांना धडक लागली. त्या धडकेत निळ्याशार मोर पिसांचा मोर धाडकन जमिनीवर कोसळला.
 
त्यावेळी हुतात्मा चौकात असलेले नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी बाळू लिये आणि नेरळ माथेरान टॅसी संघटनेचे कार्यकर्ते किशोर भोईर यांनी त्याची माहिती वन विभागाला दिली.त्यानंतर तत्काळ वन कर्मचारी हे घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मोराला उचलून टॅसी स्टँड कार्यालयात आणले.
 
वन विभागाचे वनक्षेत्र पाल उमेश जंगम आणि विभागाचे वनपाल एस एस म्हात्रे हे वन कर्मचारी आणि मजूर यांच्यासह हजर होते. वन विभागाने मृत मोराला कार्यालयात नेला नेले असून चिंचवली येथील पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
 
त्यावेळी या मोराच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतर संबंधित मृत मोराचे शासकीय नियमानुसार अंतिम विधी केले जातील. मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने ते नियम अंतिम विधीसाठी वापरले जाणार असून नेरळ गावातील रहिवाशांनी
या मानवी वस्तीत येणार्‍या मोरांपैकी एका मोराच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.