सलमान खानच्या घरावर गोळीबार करणार्‍यांचे पनवेलमध्ये होते वास्तव्य

By Raigad Times    16-Apr-2024
Total Views |
 panvel
 
पनवेल | अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला करणारे दोन्ही हल्लेखोर एक महिन्यापासून पनवेल येथे वास्तव्यास होते. पनवेलमधूनच त्यांनी सदर दुचाकी विकत घेतल्याची माहिती पुढे आली आहे. रविवारी (१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळ्या झाडल्या.या घटनेनंतर बॉलीवूड जगतात खळबळ उडाली आहे.
 
गोळीबार केल्यानंतर दोन्ही हल्लेखोरांनी दुचाकी माऊंटमेरी चर्च जवळ थांबविली आणि तिथून ते वांद्रे स्थानकात जाऊन लोकल पकडून पसार झाले. त्यानंतर त्या दोघांनी सांताक्रूझ स्थानकात उतरून रिक्षा पकडली.पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार,दोघांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाचा वापर करून शहराबाहेर पळ काढला असावा.
 
गॅलेसी अपार्टमेंटवर गोळीबार केल्यानंतर काही तासांतच अनमोल बिश्नोई नामक फेसबुक अकाऊंटवरून सलमान खानला इशारा देणारी कथित फेसबुक पोस्ट टाकण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या पोस्टची सत्यता पडताळली. सदर पोस्ट पोर्तुगालच्या आयपी ड्रेसवरून अपलोड झाली असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बिश्नोई गँगकडून याआधी तीन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. यापैकी दोन वेळा सलमान खान तर एकदा आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. दरम्यान, पनवेल येथील फार्महाऊसवर सलमान खानवर हल्ला करण्याची हल्लेखोरांची योजना आखली होती का? या शयतेचाही तपास आता पोलीस करत आहेत.