कर्जतमधील जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस; चोरटे गजाआड

By Raigad Times    16-Apr-2024
Total Views |
 alibag
 
कर्जत | कर्जत पोलिसांनी जबरी चोरी व घरफोडीच्या अशा दोन गुन्ह्यातील चोरट्यांना अटक करून दोन लाख २६ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत, तो मूळ मालकांना केला परत आहे. जबरी चोरीचा तपास चार महिन्यात व घरफोडीचा तपास केवळ अडीच महिन्यात लावण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.
 
कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये १२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आपल्या मुलांना सोडण्यासाठी आलेल्या तीन महीलांचे गळ्यातील सोन्याचे दागीने दोन अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवरून पाठीमागुन येवून जबरीने खेचून चोरी करून पसार झाल्या बाबतचा गुन्हा कर्जत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलेला होता.
 
सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरिता तत्कालीन उप विभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी तयार केलेल्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक पुरावे व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने गुन्हयातील चोरट्यांना अटक केली व त्यांच्याकडून जबरी चोरी करून नेलेला ९१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.
 
तर १ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी बारा ते सव्वाचार वाजण्याच्या दरम्यान साई गणेश अपार्टमेंट सी विंग रुम नं.१०४, मालवाडी रोड, नानामास्तर नगर, कर्जत येथे राहणारे दिलीप रामचंद्र भोईर यांचे बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडुन घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे एकूण एक लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दिवसा घरफोडी चोरी करून नेला.
 
याबाबत अज्ञात चोरट्याविरूध्द कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याची पोलीस अधिकार्‍यांनी तयार केलेल्या तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक पुरावे व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने गुन्हयातील चोरांना अटक करून घरफोडी चोरी करून नेलेल्या मुद्देमालापैकी एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने व गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मॉडेलची मोटारसायकलदेखील जप्त करण्यात आली आहे.या दोन्ही गुन्हयातील हस्तगत करण्यात आलेला एकूण दोन लाख २६ हजार ५०० रूपये किमतीचा मुझेमाल न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.