अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल ! इंडिया महाआघाडीचे रायगडचे उमेदवार

By Raigad Times    16-Apr-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (ठाकरे गट) इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. दिवसभरात त्यांच्याशिवाय अन्य तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केल आहेत. सोमवारी (१५ एप्रिल) रोजी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्यांचा अर्ज स्वीकारला. यावेळी आमदार भास्कर जाधव, शेकाप आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे प्रविण ठाकूर आणि अनिल तटकरे उपस्थित होते. अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. शेकाप भवन येथून एक पदयात्रा सुरु झाली.
 
छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर गीतेंसह अन्य मान्यवरांनी शवाजी महाराजांना अभिवादन केले. यानंतर अलिबागची ग्रामदेवता काळंबादेवीचे दर्शन घेतले. यानंतर उमेदवार गीते यांच्यासह फक्त पाचजण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.
 
alibag
 
या शिवाय नितीन जगन्नाथ मयेकर आणि शेकापचे आस्वाद जयदास पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाग्यलक्ष्मी सभागृहात जमलेल्या कार्यकर्त्यांना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देशात लोकशाही टिकवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला.
 
यावेळी भास्कर जाधव, आ. जयंत पाटील, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास १२ एप्रिल पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. सोमवारी १५ एप्रिल रोजी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या अर्जाचा समावेश होता.
 

alibag  
 
नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नाव
अनंत गंगाराम गिते (१+ ३ अर्ज) (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे),नतीन जगन्नाथ मयेकर अपक्ष (१),आस्वाद जयदास पाटील अपक्ष (१).अनंत गिते (अपक्ष) (१अर्ज),अनंत बाळोजी गिते (अपक्ष) (१अर्ज)
अनंत गीते नावाचे आणखी दोन उमेदवार
लोकसभा, विधानसभा निवडणूकीत प्रमुख पक्षाच्या उमेदवाराच्या नावाशी साधर्म्य असलेली माणसं उभी करण्याची चाल यावेळीही विरोधकांनी खेळली आहे. शिवसेना नेते अनंत गीते यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापुर्वी, अपक्ष अनंत पद्मा गिते आणि अनंत बाळोजी गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
 
विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार प्रत्यक्ष न येता, सूचकांकरवी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल दाखल केले आहेत. अपक्ष दोन्ही गीते निवडणूकीच्या रिंगणात कायम राहिले तर यावेळी रायगडमधून अनंत गीते नावाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात दिसणार आहेत.
विरोधक कुठल्या युगात वावरत आहेत त्यांनाच माहित. कारण आता मतदार सुशिक्षीत आहे. शिवाय मतदार कुठल्या उमेदवाराचे नाव पाहून नाही तर निशाणी पाहून मतदान करतो. त्यामुळे नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे केल्याने फारसा फरक पडत नाही. - भास्कर जाधव, आमदार, चिपळूण
शिवसेना, इंडिया आघाडीचा मी एकच अनंत गीते अधिकृत उमेदवार आहे. माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केला आहे. त्यामुळे अन्य कोणी उमेदवारी भरली असेल तर मला माहित नाही.- अनंत गीते, उमेदवार, शिवसेना, महाआघाडी
अनंत गीते यांच्याकडे ७.५ कोटींची संपत्ती
अलिबाग | रायगड लोकसभा निवडणूकीजतील शिवसेना इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्याकडे सुमारे ७ कोटींची एकूण संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे. अनंत गीते यांच्यावर कुठलाही गुन्हेगारी स्वरुपाचा गुन्हा दाखल नाही.
 
त्यांच्या नावावर साडेआठ तोळे तर पत्नीच्या नावे ३८ तोळे सोने आहे. त्याची आताच्या बाजारमूल्यानुसार किंमत सुमारे ३० लाख २१ हजार ९२० इतकी आहे. ३ लाख ५४ हजार ५७८ इतकी किंमत असताना हे सोने त्यांनी खरेदी केले आहे. रायगड जिल्ह्यातील दाभिळ येथे त्यांच्या दोन जमिनी आहेत.
 
त्याची किंमत ११ लाख ८९ हजार ६४६ इतकी आहे. मुंबईत त्यांचे तीन ब्लॉक आहेत. हे १९९० आणि २०१० मध्ये त्यांनी २ कोटी ३ लाख ९२ हजार रुपयांना खरेदी केले होते. त्याचे आताचे बाजारमूल्य ५ कोटी ८५ लाख ३८ हजार ९४६ इतकी आहे.चार बँक खात्यांमध्ये गीते यांची ६२ लाख १८ हजार ७४२ इतकी सेवींग आहे.
 
तर १ कोटी २३ लाख ६९ हजार ७०० रुपये फिक्स डिपॉझीट त्यांनी ठेवली आहे. १ कोटी २३ लाख ६९ हजार ७०० रुपये इतकी ही रक्कम होते. दरम्यान, अनंत गीते यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत वाढलेले बाजारमूल्य वगळा कुठलीही वाढ दिसत नाही.