कुणबी, मुस्लिम समाज महायुतीच्या पाठीशी... आ. भरत गोगावले यांना विश्वास

By Raigad Times    15-Apr-2024
Total Views |
 mahad
 
महाड | विरोधकांकडे विकासाचे कुठलेच मुद्दे नसल्याने, समाज व धर्माचा आधार घेत समाजात दुजाभाव पसरवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप महाडचे आमदार आ. भरत गोगावले यांनी केला. देशाचे पंतप्रधान मोदी हे कुठल्या समाजाच्या विरोधात नसून ते देशद्रोह्यांच्या विरोधात आहेत असेही ते यावेळी म्हणाले.
 
सहावेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या अनंत गीते यांना, दासगांव ते गोठे पुल, खाडीपट्टयातील जनतेची पाणी समस्या दिसली नाही. या दासगांव गोठे पुलासाठी ११२ कोटी, दासगांव वहूर, केंबुर्ली गावासाठी खैरे धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत १५ कोटी, दाभोळ टोळ साठी १२ कोटीची पाणी योजना आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली. त्यामुळे विरोधकांनी कितीही बोंबा मारल्या तरीही महाड मतदार संघातील कुणबी व मुस्लिम समाज आमच्या पाठीशी असेल असा विश्वास आ. गोगावले यांनी व्यक्त केला.
 
१५ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी कधीही जाती धर्मा बाबत दुजाभाव केला नाही. महाडमधील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या वेळी सुरुवातीपासून शेवटचा अपघातग्रस्त उपचारासाठी जाईपर्यत आपण व तटकरे साहेब घटनास्थळी तळ ठोकून होतो. त्यावेळी अनंत गीते कुठे होते, असा सवाल ना. आदिती तटकरे यांनी दासगांव येथील महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रचार सभेत केला.
 
विकास गोगावले यांनी वहूर गणातील किती कुणबी युवकांना गीतेंनी रोजगार दिला असा सवाल करीत उबाठा सुबाठा मध्ये कुणीही गेले तरी इथला मतदार कायम भरतशेठ यांच्या पाठीशी आहे हे इथली गर्दी सांगत आहे. त्यामुळे तटकरेसाहेब राज्यातील टॉप टेन विजयी उमेदवारांमध्ये असतील असा विश्वास व्यक्त केला.
 
यावेळी इकबाल चांदले, रिहान देशमुख, अख्तर पठाण या शिवसेनाय्राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक पदाधिकार्‍यांनी विरोधक मुस्लिम समाजाबाबत खोटा प्रचार करीत असून मतदार संघातील १०० टक्के मुस्लिम समाज महायुतीसोबत असल्याची ग्वाही दिली.याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, उपजिल्हा प्रमुख विजय सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडीक, महिला आघाडीच्या निलिमा घोसाळकर, राष्ट्रवादीच्या सरचिटणीस संचिता निगुडकर, महिला संपर्क प्रमुख सपना मालुसरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष निलेश महाडीक, आरपीआयचे मोहन खांबे, केशव हाटे, युवासेनेचे विपुल उभारे, माजी राजिप सदस्य जितेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते