नेरळ कळंब मार्गावर कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

By Raigad Times    15-Apr-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत | नेरळ-कळंब राज्यमार्गावर एका चारचाकी वाहनाने मोटारसायकल आणि हातगाडीला धडक दिली. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाडी जवळील एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आणि मोटारसायकल जखमी झाला. या मध्ये मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे.
 
नेरळ-कळंब राज्यमार्गावर पुणे येथील पर्यटक नेरळ साईमंदिर परिसरातून जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या विरूध्द बाजूला कडेला असणार्‍या ज्यूस विक्रीच्या हातगाडीला आणि एका मोटार सायकलला धडकली. या धडकेत हातगाडीवाला तरुण गंभीर जखमी झाला आहे.
 
घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल पाटील हे हजर झाले होते. स्थानिकांच्या मदतीने पाटील यांनी जखमीला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचारा करिता हलवले. यानंतर पुढील उपचारासाठी जखमी तरुणाला उल्हास नगर येथे हलवण्यात आले आहे.
 
या राज्य मार्गावर गतिरोधक बसवण्यात यावे म्हणून ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत असून या राज्य मार्गाची रुंदी देखील वाढवून रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.