नवीमुंबईतील तरुणांचे २ कोटी ठगवले ; आरबीआयमध्ये सुरक्षारंक्षकाची नोकरीचे आमिष दाखवून

By Raigad Times    15-Apr-2024
Total Views |
 navi mumbai
 
नवीन पनवेल | आरबीआय बँकेमध्ये सुरक्षारक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, एका ठकसेनने नवी मुंबईतील २६ जणांना तब्बल २ कोटी २४ लाख रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐरोली येथे राहणारे संदीप चव्हाण याची ओळख खारघर सेक्टर दोन येथे राहणार्‍या सदानंद भोसले याच्याकडे झाली.
 
२०२० मध्ये आर्मी मधून रिटायर झालेल्या माजी सैनिकांना आरबीआय बँकेत नोकरी लावून दिले असल्याचे सदानंद यांने संदिपला सांगितले. आरबीआयमध्ये नोकरी हवी असल्यास चार लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. सदानंदच्या बोलण्यावर संदिपचा विश्वास बसला. पैसे दिल्यानंतर दोन महिन्यात काम होईल असे त्यावेळी सांगण्यात आले.
 
दरम्याच्याकाळात वैद्यकीय तपासणीसाठी आणखी पैसे मागितले. एकूण सहा लाख पाच हजार रुपये सदानंदच्या खात्यात पाठवले. बरेच दिवस झाले तरी नोकरी न लागल्यामुळे सदानंद भोसले विषयी आरबीआय बँकेमधील कर्मचार्‍यांकडे संदिप याने चौकशी केली.
 
यानंतर भोसले याने नोकरीला लावतो असे सांगून जवळपास २५ ते ३० जणांकडून नोकरी लावण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याचे समजले. त्यानंतर संदिपने सदानंद याच्याकडे आपले पैसे परत मागायला सुरुवात केली. वेळोवेळी मागणी केल्यानंतर त्याने सहा लाख पाच हजारांचा चेक संदिपला दिला. मात्र भोसले याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचे समजले.
 
यानंतर संदिपने खारघर पोलीस ठाण्यात तक्रर केली असून पोेलीसांनी सदानंद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदानंद भोसले आरबीआय बँकेत नोकरी लावतो असे सांगून २६ जणांकडून दोन कोटी २४ लाख ६० हजार ५०० रुपये घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे.