बाळगंगा धरणग्रस्तांचा निवडणूकीवर बहिष्कार , पुर्नवसन रखडले! १४ वर्षांचा वनवास संपेना

जिल्हाधिकारी तथा, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले पत्र

By Raigad Times    13-Apr-2024
Total Views |
pen
 
पेण | पेण तालुक्यात बाळगंगा धरणाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यात न आल्याने प्रकल्पग्रस्तांनी रायगड लोकसभेसह येणार्‍या पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
 
तालुक्यातील ९ गावे व तेरा आदिवासी वाड्या या बाळगंगा धरणतात येत असून येथील जवळपास ३००० हुन अधिक कुटुंब विस्थापित होणार आहेत. गेली १४ वर्ष या प्रकल्पाला होत आली परंतु येथील प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सिडकोद्वारे सदर धरणाचे बांधकाम हे वाणिज्य प्रयोजनाकरीता असल्याने सिडकोच्याधर्तीवर प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन करावे, पुर्नवसन होणार्‍या गावांसाठी गावठाणाची जागा निश्चित करावी.
 
पनवेलमध्ये होऊ घातलेला विमानतळाचा दर, वसई विरार कॉरीडोअर देऊ केलेला दर लागू करून प्रकल्पग्रस्तांना तो सरसकट द्यावा तसेच सद्यस्थितीत बाळगंगा जमिन मोबद्याला गुणांक १.५० ने झाला असून निवाडा २०१५ मध्ये १.१० ने जाहीर केला परंतु १.५० पैकी ०.४० ची रक्कम सिडकोने जमा केली आहे. सदर रक्कमेचा निवाडा शासन दरबारी महसूल सहाय्यक यांनी सन २०१० पासून आजपर्यंत व्याजासहीत मंजूर करावा.
 
शेतकरी असल्याचा दाखला कायमस्वरूपासाठी द्यावा व प्रत्येक बाधीत कुटुंबाला दारिद्र्य रेषेखाली घ्यावे. पिवळे रेशनकार्ड व अन्नसुरक्षा कायदा लागू करून बाधीत कुटुंबाना दारिद्र्य रेषेखाली दाखला द्यावा. नव्याने वाढ झालेल्या कुटुंब व घरे, १८ वर्षावरील मुल स्वतंत्र कुटुंब म्हणून गृहीत धरून संकलनामध्ये समाविष्ठ करण्यात यावीत.
 
अशा जवळपास १६ मागण्या प्रलंबित आहेत. सदरच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्त रायगड लोकसभेसह येणार्‍या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन आज बाळगंगा धरण व पुनर्वसन संघर्ष समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
 
यावेळी समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, सुनील जाधव, चंद्रकांत होजगे, नंदू पाटील, जयवंत नारकर, वासुदेव पाटील, भगवान पवार, मोहन पाटील, सुरेश बने, भरत कदम, सुनील भुगे, बळीराम भऊड, राजा पाटील आदिंसह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेताना दुःख होत आहे, मात्र १४ वर्षे हा प्रकल्प रखडल्याने शेतीला भाव नाही, पुनर्वसन होत नाही, प्रकल्पग्रस्तांना योग्य सुविधा मिळत नाहीत, नोकर्‍या नाहीत. एकीकडे पुनर्वसन प्रक्रिया शंभर टक्के पुर्ण झालेले असताना या सुविधा मिळत नसल्याने निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
- अविनाश पाटील, अध्यक्ष, बाळगंगा धरण संघर्ष समिती
कांदळेपाडा ग्रामस्थांचाही निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
पेण | कांदळेपाडा ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून तसे पत्र प्रांताधिकार्‍या दिले आहे. ग्रामपंचायतमधील रस्त्यांच्या अपूर्ण कामांबाबात पाठपुरावा करुनही प्रशासनाने कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कांदळे, गावालगत तसेच कांदळेपाडा व उचेडे या गावाच्या मधून राष्ट्रीय महामार्ग जाते. या परिसरात या महामार्गाचे काम पूर्ण आले आहे. मात्र बाजूला असणार्‍या या गावांना जोडणारे सर्विस रोड, गटारे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. भोगद्यातून जाताना, पुष्पक हॉटेलपर्यंत मोठ मोठे खड़डे व पेव्हर ब्लॉक निघाल्यामुळे अपघात होण्याची भिती ग्रामस्थांना आहे. अशी अनेक कामे प्रलंबीत असल्याने ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.