लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज होणार दाखल , निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करावे;जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन

By Raigad Times    12-Apr-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आज (१२ एप्रिल) पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल करतांना निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, खर्च पथक प्रमुख राहुल कदम, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.
 
नामनिर्देशनपत्र दि. १२ ते १९ एप्रिल या दिवशी ११ ते ३ या वेळेत स्विकारले जाणार आहेत. एका उमेदवारास अधिकाधिक ४ नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. दोनपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात नामनिर्दे शनपत्र दाखल करता येणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा कमी नसावे. रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे.
 
 
संपूर्ण जिल्ह्यातील २३ लाख १६ हजार ५१५ मतदारांची यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये तिसर्‍या टप्प्यामध्ये ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.
 
रत्नागिरी जिल्हा मधील दापोली व गुहागर विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो त्यातील मतदारांसह मतदारसंघामध्ये एकूण १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार आहेत. विशेष म्हणजे मतदान दिवशी मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टीग केले जाणार आहे. जिल्ह्यात १६९१ पैकी १४०९ शस्त्रे जमा झाली असून राज्यात रायगड जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे.
 
तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने २१६ गुन्हे दाखल केले आहेत. भरारी पथके (फ्लाईंग स्काड) कार्यरत झाले आहेत. व्हिडिओ निरीक्षण पथक (व्हिडिओ सर्विलंस टीम- व्हीएसटी), खर्च निरीक्षण पथक (स्टाटिक सर्विलंस टीम -एसएसटी) अशी पथक स्थापन करण्यात आली आहे नामनिर्देशनपत्र दाखल करता वेळी येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात बंधनकारक राहील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयीन परिसरात आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची उमेदवारांनी किंवा त्यांचे प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी.
 
पाच व्यक्तींना प्रवेश जिल्हाधिकारी म्हणाले, नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात उमेदावारासहीत एकूण ५ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. (त्यामध्ये उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल.) नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराच्या केवळ ३ वाहनांना कार्यालयाच्या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे.
 
सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम २५ हजार रुपये व उमेदवार अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील असल्यास १२ हजार ५०० रुपये भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत नामनिर्दे शनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे.