विजेचा लपंडाव की, छुपे भारनियमन ? नागरिक झोपी गेल्यानंतर मध्यरात्री केली जाते बत्ती गूल

By Raigad Times    12-Apr-2024
Total Views |
 Alibag
 
अलिबाग । दिवसा उन्हाचा कडाका सहन केल्यानंतर रात्री पंख्याखाली शांत झोपायचा विचार करणार्‍या अलिबागकरांना गेले चार दिवस वीज वितरण कंपनी शॉक देते आहे. मध्यरात्री लोकं झोपी गेली की, एक ते दोन तासांसाठी वीज गायब केली जाते. हा भारनियमनाचाच प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया नागरिकांमधून उमटत आहेत.
 
लोकसभेची निवडणूक सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे उमेदवार विकासाच्या गमजा मारत फिरत आहेत. अशात वीज वितरण कंपनीने ग्रामीण भागामध्ये भारनियमन सुरू केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अघोषित भारनियमन केले जाते; मात्र तांत्रिक दोषांचे कारण लोकांना सांगितले जात असल्याची जनभावना आहे.
 
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या दिवशी, रात्री एक-दोन वाजल्यानंतर वीज घालवण्यात येते. त्यामुळे गर्मीमुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांना मध्यरात्री अंथरुणावर उठून बसायची वेळ आली आहे. एक ते दोन तास ही वीज घालवण्यात येते. सकाळी अतिशय कमी दाबाने वीज सुरु करण्यात येते. त्यामुळे टाक्यांमध्ये पाणी चढवणे मुश्कील होऊन जाते.
 
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांमध्ये नाराजी पसरू नये म्हणून रात्री वीज घालवून छुपा डाव वीज कंपनी खेळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वीज वितरणच्या अधिकार्‍यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.