रोह्याजवळ जंगलाला भीषण वणवा; वनसंपदा भस्मसात

By Raigad Times    12-Apr-2024
Total Views |
 Roha
 
रोहा | रोहा तालुक्यातील हाळ, विरजोली भागात अदानी प्रकल्पाच्या कर्मचार्‍यांनी बोअरवेल मारण्याच्या नावाखाली पेटवलेल्या आगीने भीषण स्वरुप घेतले. त्यामुळे हाळ, विरजोली परिसरातील वनसंपदा भस्मसात झाले आहे. अनेकांच्या फार्म हाऊसमधील आबंराई, नारळी, सुपारी, काजूच्या बागा अक्षरशः होरपळून गेल्याने एकच खळबळ उडाली.
 
रेल्वे प्रकल्पासाठी शेतकरी सहज जमिनी देत नसल्याने अदानीच्या कामगारांनी जंगलांना वणवा लावून शेतकर्‍यांना मानसिक खच्चीकरणाचा केल्याचा आरोप शेतकर्‍यांतुन होत आहे. यावर्षीच्या जंगलांना लागलेल्या सर्वाधिक वणव्याच्या
घटनांतून बोलले जाते, तर वणव्याच्या भीषण घटनेनंतर विरजोली गावातील शेतकर्‍यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
 
चुल्यावर जेवण बनवण्यातून हा आगीचा भडका उडाला असे कर्मचार्‍यांनी सांगितले. मात्र कर्मचारी खोटे बोलत आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक जंगल पेटवून दिले, अशी माहिती आज बाधीत शेतकरी, रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी नारायण पानसरे यांनी दिली.
 
शेतकर्‍यांना हैराण करायचे, त्यांची पारंपारीक सुबत्ता नष्ट करायची असाच हा प्रकार आहे असे पानसरे यांनी पुढे सांगितले. भीषण वणव्यात वनसंपदा यांसह उषा नाईक, पांडुरंग ठाकूर, नारायण पानसरे यांच्या फार्मचे मोठे नुकसान झाले. तशी तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. पंचनामा करण्यात आले. बुधवारी अदानी ग्रुपच्या अधिकार्‍यांनी प्रशासनाशी संपर्क साधून प्रक्रियेनंतर नंतर संबंधीत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देणार असल्याच्या उर्मट उत्तराने शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला.