अतिरिक्त फी वाढीविरोधात युवासेना आक्रमक ; खरसुंडीतील सेंट मेरी स्कूलची मनमानी

By Raigad Times    11-Apr-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | खरसुंडीतील सेंट मेरी स्कूलच्या अतिरिक्त फी वाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना कॉलेज कक्षाच्या पदाधिकार्‍यांनी विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होवू नये, यासाठी बुधवारी (१० एप्रिल) खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना निवेदन देण्यात आले आहे.
 
शाळा व्यवस्थापनाने फी कमी न केल्यास ठाकरे गट युवा स्टाईलने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा युवासेनेच्या कॉलेज कक्षाचे तालुका अधिकारी प्रतीक शिंदे यांनी दिला आहे.खरसुंडी गावाशेजारील सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालकांनी २०२४ या शैक्षणिक वर्षात ३० ते ४० टक्क्याने अतिरिक्त फी वाढविली आहे.
 
त्यामुळे पालकवर्ग त्रस्त झाला असून, त्यांचे अर्थिक बजेट कोलमडले आहे. शाळा व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतरही शाळा व्यवस्थापन फी वाढीवर ठाम आहे. त्यामुळे जोपर्यंत फी कमी होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.
 
पालकवर्ग शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत असताना पालकांची व्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कॉलेज पक्षाने जाणून घेत शाळा व्यवस्थापनाला धारेवर धरले. यासंदर्भात गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देत ती वाढीव फी कमी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
 
तर प्रशासनाने याचे गांभीर्य न घेतल्यास ठाकरे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला. इयत्ता सातवीची फी १३ हजाराहून २३ हजारांवर पोहचल्याने पालक वर्ग आक्रमक झाला आहे.खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीला युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील, युवासेना कॉलेज कक्ष कर्जत खालापूर विधानसभा अधिकारी सुजल गायकवाड, उपअधिकारी धर्मेंश परमार, खालापूर तालुका अधिकारी प्रतिक मोरेेशर शिंदे, खोपोली शहर अधिकारी जय निवृत्ती खेडकर, रायगड जिल्हा सक्रीय सदस्य हरेश कराळे, कर्जत शहर सहसंपर्कप्रमुख विनोद पांडे, युवती सेना तालुका संपर्कप्रमुख रिया मालुसरे, विभाग प्रमुख शरद घोडविंदे, विभागप्रमुख किशन चौहान, वैभव दळवी, एकनाथ कोळंबे आदी प्रमुखांसह पालक मच्छिंद्र पोलेकर, संतोष नलावडे, हेमंत चव्हान, दृष्टी गुजर, नितीन पाटील, दीपक पाटील, जितेंद्र बोदार्डे, महेश पाटील, गोपीचंद तुपे, अिेशनी बोदार्डे हे उपस्थित होते.सेंट मेरी शाळेत यावर्षी अतिरिक्त ३० ते ४० टक्क्याने फी अचानक वाढ करून पालकांची आर्थिक लूट शाळा व्यवस्थापन करत असल्याने ही लूट थांबावी, यासाठी आम्ही गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. जर त्यांनी आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास काही दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल व आंदोलनाच्या काळात आजच्या संहिता लागू असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा युवासेनेच्या कॉलेज कक्षचे तालुका अधिकारी प्रतीक शिंदे यांनी दिला आहे.