सुनील तटकरे-गोगावलेंची दिलजमाई ! तटकरेंना परत खासदार करणार,आ. गोगावले पिता-पुत्राने दिला शब्द

11 Apr 2024 12:40:38
mahad
 
महाड | यांना ओळखलंत? हो, तेच आहेत, आ. भरतशेठ...रायगड जिल्ह्यात गेली पाच वर्षे तटकरेंना पाण्यात शोधत होते... त्यांच्या मुलीला पालकमंत्री पदावरुन हटविण्यासाठी जीवाचे रान यांनीच केले होते. पोस्कोवरुन राडादेखील यांच्याच पोरांनी केलेला...इतके दिवस पाठ शिवणीचा खेळ असलेले, सुनील तटकरे आणि भरत गोगावले आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुझा गळा, माझा गळा...चा शो घेऊन फिरत आहेत.
 
आ. गोगावलेंना मंत्रीपद न मिळण्यामागे सुनील तटकरेंचाच हात. शेवटच्या कार्यकर्त्यांना तसेच वाटत होते. आज तेच भरत गोगावले तटकरेंच्या विजयासाठी पायघड्या घालत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घडाळ्याला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
 
त्यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सुनील तटकरे यांना खासदार करण्यासाठी मतदान यंत्रावर शिवसेनेचे धनुष्यबाण शोधत बसू नका.यावेळी आपल्याला घड्याळ चिन्हासमोरचे बटन दाबायचे आहे. आमची सर्व ताकद मतांच्या रूपाने तुमच्या पारड्यात टाकू, असा शब्द आ. भरत गोगावले यांनी तटकरेंना दिला आहे.सुनील तटकरे यांनाही आता आ.भरत गोगावले ‘विकासपुरुष’ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.
 
ते म्हणतात, ‘‘या मतदारसंघात काकणभर सरस काम आमदार भरतशेठ गोगावले यांनी केले आहे. साडेतीन हजार कोटींचा निधी त्यांनी आणला आहे. या तालुक्याच्या ज्या गरजा आहेत, विशेष करून तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी एमआयडीसी आणणे हे गरजेचे आहे.
 
त्यामुळे भारत सरकारच्या माध्यमातून पर्यटनाच्या योजना पोलादपूर तालुक्यात आणल्या जातील’’, अशी ग्वाही ते देत आहेत.बगलेत नॅपकिन घेऊ न मंत्रालयामध्ये फिरणारा आमदार म्हणून भरतशेठ गोगावले यांच्यावर अनेकदा टीका केली. मात्र, याच आ.भरतशेठ गोगावले यांनी, विकासकामांचा निधी प्रचंड प्रमाणात आणून जो धडाका लावला, त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढ थोडेच आहे.
 
आगामी काळात तटकरे आणि गोगावले हे दोघे महाड पोलादपूर तालुक्यांतील रोजगार, सिंचन, पर्यटन तसेच विविध प्रश्नांमध्ये हातात हात घालून जनतेची सेवा करताना पाहायला दिसतील. जनताच आता घड्याळ्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून केंद्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यास सिध्द झालेली पहायला मिळेल. गीते यांनी सत्ता उपभोगाचे साधन म्हणून वापरली, आम्ही जनसेवेचे काम म्हणून सत्तेकडे पाहात आहोत.
 
आपत्कालीन मदतीसाठी दोनच पक्षाचे कार्यकर्ते लोकसेवेसाठी राबत होते. भाजपही होता. कोरोना काळात आम्ही राबत होतो असेही तटकरे सांगतात.भरतशेठ गोगावले हे त्यागमूर्ती आहेत,त्यांचा लवकरच महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश होईल, अशी साखरपेरणी तटकरे यांनी करुन आगामी काळातील बेरजेच्या राजकारणाची पायाभरणी केली.
 
कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले तटकरे-गोगावले यांच्या राजकीय नाटकाचा नवा अंक पाहून रायगडकर तृप्त होत आहेत.आमदार पूत्र विकास गोगावले यांनाही खा. तटकरे यांना केंद्रीय मंत्री झालेले पहायचे आहे. शेकापक्षाच्या आ.जयंत पाटील यांना लेकीला म्हणजेच स्नेहल जगतापला विधानसभेत पाठवायचे आहे.
 
पण जयंतभाई तुमच्या मुलाला तुम्ही जिल्हा परिषदेत पाठवू शकला नाहीत तर लेकीला कसं पाठवाल? असा सवाल विकास गोगावलेंनी केला आहे.महाड एमआयडीसीमध्ये अवघड उद्योग खाते मिळाल्यानंतर गीते आले नाहीत, कधी आलेच तर एमआयडीसीतील केएसएफच्या रेस्ट हाऊसमध्ये येऊन परस्पर निघून जात असते, त्यामुळे त्यांच्याकडे उद्योग अथवा तरूणांना रोजगार मिळेल, अशी मागणी करण्याची इच्छाच झाली नाही, असे विकास गोगावले अभिमानाने सांगत आहेत.
Powered By Sangraha 9.0