११ दुचाकी चोरणार्‍या त्रिकूटाला खांदेेशर पोलिसांनी केले गजाआड

11 Apr 2024 18:52:03
 Panvel
 
नवीन पनवेल | खांदेेशर, पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरातून बुलेट आणि इतर मोटरसायकल चोरी करणार्‍या राजस्थानी टोळीला खांदेेशर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ११ मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत. नवीन पनवेल, पनवेल, कामोठे या भागातून गेल्या बर्‍याच दिवसांपासून बुलेट गाड्यांसह इतर मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या.
 
त्यानुसार खांदेेशर पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक समीर चासकर आणि सपोनी शरद बरकडे यांच्या दोन्ही पथकांनी मोटारसायकल चोरीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करून त्याचा अभ्यास करून —चोर निष्पन्न केले.
 
सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीतांच्या लोकेशनचा मागोवा घेऊन त्यांना शिवा कॉम्प्लेक्स, नवीन पनवेल येथून पहाटेच्या वेळी ताब्यात घेतले.त्यांनी बुलेट व इतर मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. चोरी केलेल्या गाड्या कामोठे, नवीन पनवेल परिसरात विक्री करता सोडून दिल्याचे तसेच काही गाड्यांचे नंबर बदलून पुणे शहरात व पाली, राजस्थान येथे दिले असल्याचे सांगितले.
 
जगदीश चुन्नीलाल माळी (राहणार रावेत, पुणे), प्रवीण रामलाल सिरवी (राहणार विचुंबे), अरविंदकुमार भवरलाल हिरागर (राहणार सेक्टर ३६, कामोठे) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून पाच बुलेट आणि इतर सहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तिन्ही चोरांचे मुळगाव मारवाड जंक्शन, पाली राजस्थान येथील आहे.
Powered By Sangraha 9.0