रायगडातील शेतकर्‍यांनी केला ‘एनटीडीए’ला कडाडून विरोध ; २५ हजार शेतकर्‍यांनी नोंदवल्या हरकती

By Raigad Times    11-Apr-2024
Total Views |
 uran
 
उरण | एमटीएचएल (अटल सेतू) प्रभाव क्षेत्राजवळचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला न्यू टाऊन डेव्हलपमेंट ऍथॉरिटी (एनटीडीए) नेमण्याच्या शासनाच्या अधिसूचनेला रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांतून २५ हजारांपेक्षा अधिक शेतकर्‍यांनी हरकती नोंदविल्या आहेत.
 
यासंदर्भात अंतिम तारीख सरली असली तरी हरकती नोंदविण्यात येत आहेत.या हरकतींमध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांना विेशासात न घेता घेतलेल्या निर्णयाला विरोध, शेतकर्‍यांनी आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी बांधलेली घरे आणि भविष्यातील पिढ्यांसाठीची गावठाण आणि सार्वजनिक वापरासाठी भूखंड याबाबतचे हरकती मांडण्यात आल्या आहेत. तसेच मूळ गावठाण शाबूत राहिले पाहिजे ही पूर्व अट यामध्ये आहे.
 
Uran
 
एमएमआरडीएच्या अधिसूचनेला ७ एप्रिलपर्यंत लेखी हरकती नोंदविता येणार होत्या. कोकण विभागाच्या नगररचना सहसंचालकांनी या हरकती नोंदवून घेतल्या आहेत. त्याची मोजणी करण्यात येणार आहे. एमएमआरडीएने जाहीर केलेल्या अधिसूचनेला शेतकर्‍यांनी आतापर्यंत हरकती नोंदविल्या आहेत.
 
येथील गावातील जमिनीच्या परिसराच्या विकासाची जबाबदारी शासनाने सिडकोऐवजी एमएमआरडीएला दिली आहे. राज्य सरकारकडून ४ मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील १२४ गावांसाठी नवनगर विकास प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नेमणूक केली आहे.
 
सहसंचालक नगर रचना, कोकण विभाग, तिसरा मजला येथे शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींनी जमून या हरकती नोंदविल्या.शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेला ७ एप्रिलपर्यंत हरकती नोंदवून घेण्यात आल्याची माहिती कोकण नगररचना सहसंचालक जितेंद्र भोपळे यांनी दिली.
आत्तापर्यंत सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. अद्यापही शेतकरी हरकती नोंदवत आहेत. शेतकर्‍यांना हा प्रकल्प नको आहे हे यावरुन सिद्ध झाले आहे. यापुढील लढाईसाठी उरण तालुक्यात २९ गावांतील आणि पनवेल तालुक्यातील ७ गावातील लोकांची समिती गठीत करणार येणार असून त्या समितीद्वारे संयुक्तीकपणे लढा देण्यात येणार आहे.- रूपेश पाटील, समन्वयक एमएमआरडीए विरोधी शेतकरी संघर्ष समिती