अदानी पोर्टच्या रेल्वे भूसंपादन मोजणीला मुरुड परिसरातील शेतकर्‍यांचा विरोध

11 Apr 2024 15:36:18
 Murud
 
कोर्लई | अदानी पोर्टच्या आगरदांडा येथे होणार्‍या रेल्वे भूसंपादन मोजणीला येथील स्थानिक शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला आहे. येथून जाणारा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गापासून नेण्यात यावा तसेच सातबार्‍यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, अशा मागण्या करत, ग्रामस्थांनी मो-जणीला विरोध दर्शवला आणि बुधवारी (१० एप्रिल) होणारी मोजणीची प्रक्रिया उधळवून लावली.
 
महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (मुरुड-जंजिरा) विभागाने येथील शेतकर्‍यांना बुधवारी (१० एप्रिल) आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीसाठी संयुक्त नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार सकाळी ९.३० वाजता प्रत्यक्ष जागेवर हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
 
त्याप्रमाणे बुधवारी आगरदांडा येथे रेल्वे भू-संपादन मोजणीला संबंधित शेतकर्‍यांनी उपस्थित राहून सदरचा रेल्वे मार्ग हा गावाबाहेरील महामार्गालगत पासून नेण्यात यावा, अशी मागणी केली. तसेच सातबार्‍यावरील पेन्सिल शेरा रद्द करण्यात यावा, अशी मागणीही करत मोजणी होऊ दिली नाही.
 
यावेळी मुरुडच्या भूमी अभिलेखचे निमतानदार एम.पी. पोकळे, सहकारी तसेच रुषिकांत डोंगरीकर, यूसुफ अर्जबेगी,संतोष पाटील, आशिष नरेंद्र हेदूलकर, अर्पेश चिंदरकर, शब्बीर काझी, नजीर खतीब, तहसिन बशीर फकी, इमुद्दीन कादिरी, अहीर, मुब्बशिर खतीब शेतकरी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0