टेनिस क्रिकेटच्या पिचवर ग्रामीण तरुणांची पडतेय विकेट !

कामधंदे सोडून तरुण खेळतात दिवस-रात्र क्रिकेट; कुटुंबिय चिंतेत

By Raigad Times    10-Apr-2024
Total Views |
 pen
 
पेण | ग्रामीण भागासह शहरी भागात क्रिकेचा फिव्हर सध्या तरुणाईवर चढला आहे. आयपीएल क्रिकेट सुरू झाल्यापासून क्रिकेटची क्रेझ अजूनच वाढली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळला जात असताना आता ग्रामीण भागातही टेनिस क्रिकेटचे सामने ठिकठिकाणी भरवले जात आहेत.
 
त्याची व्याप्तीही आता वाढू लागली आहे. असे असताना हीच तरुणाई ही टेनिस क्रिकेटच्या प्रेमात पडून कामधंदा सोडून दिवस-रात्र मैदानावर दिसू लागली आहेत. अनेक तरुण हे रोजगारापासून वंचित असून हाताला काम नाही; पण दिवसभर मैदानावर बॅट आणि बॉलमध्ये गुंतलेले पहायला मिळत आहेत.
 
रोजगाराच्या प्रश्नाला बगल देऊन रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही तरुणाईला बिघडवत आहेत का? असा प्रश्न सध्या निर्माण होऊ लागला आहे. पूर्वीच्या क्रिकेट आणि आताच्या स्पर्धेत बदल झाला आहे. आता क्रिकेट हे व्यवसायिक झाले आहे. ग्रामीण भागात तर रोज टेनिस क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होत आहे.
 
स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक, उद्योजक यांच्या सहकार्याने तसेच लोकप्रतिनिधी हेसुध्दा लाखोंच्या बक्षिसाच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहेत. पेण तालुयासह रायगड जिल्ह्यातील अनेक मतदार संघात आतापर्यंत ठिकठिकाणी हजार हुन अधिक दिवस-रात्र टेनिस क्रिकेट स्पर्धा होऊन गेल्या आहेत व जून सुरुवातीला पावसाळा येईपर्यंत अनेक स्पर्धा नियोजित आहेत.
 
व्यावसायिक आणि गल्लीतील क्रिकेट यात मोठा फरक आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेतून उत्तम लेदर खेळणारे खेळाडू हे भारतीय संघात घेतले जातात.मात्र ग्रामीण किंवा शहरी भागत होते असलेले टेनिस क्रिकेट सामने हे फक्त व्यवसाय किंवा राजकीय हेतूने खेळवले जात आहेत.
 
सध्या तर आयपीएल धर्तीवर ही सामने भरवले जात आहेत. एपीएल, बीपीएल, सिपीएल, डीपीएल, जेपीएल असे आपल्या गावाचे नाव देऊन टेनिस क्रिकेटचे सामने भरविले जातात. त्यामुळे स्थानिक खेळाडू हे या स्पर्धेत भाग घेत असतात. पूर्वी शनिवार, रविवार क्रिकेट चे सामने खेळवले जात होते. मात्र आता आठवड्यातील सात ही दिवस रात्र सामने खेळवले जात आहेत.
 
त्यामुळे तरुणाई सुद्धा स्वतःचे कामधंदे सोडून या स्पर्धेत सहभागी होत आहेत. तर आपले मित्र व नातेवाईक खेळात भाग घेतात म्हणून त्यांचे हितचिंतक प्रेक्षक ही सामना पाहण्यासाठी आपला अनमोल वेळ वाया घालवत असतात.पेणसह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी होत असलेले क्रिकेट सामने हे स्पर्धेच्या रूपात खेळवले जात आहेत.
 
यातून हजारो ते लाखो रुपयांची बक्षिसे विजयी संघाला देण्यात येतात. तर काही मोजयाच खेळाडूंना वयक्तिक बक्षिसेही मिळतात. मात्र इतर खेळाडू हे संघ विजयी झाला यात धन्यता मानतात. बक्षीस जिंकल्यावर गावात वाजत-गाजत मिरवणूक काढतात आणि दमून थकून गप्प बसतात.
 
या होत असलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेमधून पुढील भविष्य घडेल अशी आशाच नसते. मात्र तरीही तरुणाई ही या क्रिकेट स्पर्धेच्या जंजाळात ओढली जात आहे.रायगड जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. अनेक उद्योग आहेत. तर नव्याने येत आहेत. मात्र त्या उद्योगांना हेच राजकारणी पुढाकार घेऊन विरोधही करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे.
 
सुशिक्षित होऊनही अनेक तरुण हे रोजगाराच्या शोधात आहेत. तर शिक्षित तरुण सध्या मिळेल ते काम करीत आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनिधी हे अपयशी ठरले आहेत. तर तरुणाई ही काम-धंदे सोडून टेनिस क्रिकेटच्या मागे लागली आहेत.
त्यामुळे तरुणाईने शारीरिकदृष्ट्या खेळाकडे लक्ष देणे आवश्यक जरी असले तरी आपल्या भविष्याची काळजी घेणेही तेवढेच महत्वाचे आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे भविष्य सुंदर घडवायचे असेल तर प्रत्येक तरुणाने लेदर क्रिकेट बरोबर रोजगाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आई-वडिलांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणे काळाची गरज आहे.
जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात आपले नाव कमवायचे असेल तर लेदर बॉल क्रिकेट खेळणे गरजेचे आहे. यातून खेळाडू हा आपला खेळ दाखवून पुढे जाण्यास संधी मिळवू शकतो. आज रायगड जिल्ह्यातील मुले, मुली ह्या जिल्हा
राज्य पातळीवर क्रिकेट खेळत आहेत. रायगड जिल्ह्यातील उरण तालुयातील सिध्दार्थ संजीवन म्हात्रे हा रणजी मध्ये खेळत आहे. त्यामुळे टेनिस क्रिकेट मध्ये तुम्हाला फक्त खेळण्याचा आनंद मिळून वेळ वाया जातो. मात्र लेदर क्रिकेटमुळे तुमचे करियर नक्की घडले जाऊ शकते.-शेखर भगत, ज्युनिअर लेदर क्रिकेटर प्रशिक्षक, पेण