लोकसभेसाठी राज ठाकरेंचा मोदीमार्ग ! नरेंद्र मोदींना दिला बिनशर्त पाठिंबा ; शिवतिर्थावरुन केली घोषणा

By Raigad Times    10-Apr-2024
Total Views |
Mumbai
 
मुंबई | मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात मनसेच्या राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नसून सर्व कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीचं काम करावं अशा सूचना दिल्या.
 
पण फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले आहे.मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी तुम्ही कोणत्याही अफवांना बळी पडू नका... मी जे अपत्य जन्माला घातले आहे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ तेच मी वाढवणार...मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही. असे विचार माझ्या डोक्याला शिवतही नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
 
आज उद्धव ठाकरे, संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. कारण काय तर मुख्यमंत्रीपद दिले नाही म्हणून. पण मी जो विरोध केला तो काही भूमिका पटल्या नाहीत म्हणून विरोध केला. मग उद्धव ठाकरे, संजय राऊतांना इतक्याच नरेंद्र मोदींच्या भूमिका पटत नव्हत्या तर राजीनामे खिशात न ठेवता माझ्याबरोबर मैदानात का नाही उतरलात.
 
तेव्हा सत्तेचा मलिदा खात राहिलात, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी यावेळी केला. एखादी राजकीय भूमिका घेताना ती राष्ट्रहिताची, महाराष्ट्रहिताची असेल तर मी राजकीयदृष्ट्या कुठे, कुणाबरोबर आहे हे पाहत नाही. रोखठोक भूमिका घेत आलो आहे, घेत राहीन.
 
मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो आणि विरोध केला तर तितकाच टोकाचा असतो, असे स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिले.माझा नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा २०२४ ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे.
 
मला वाटाघाटीमध्ये पाडू नका.महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप-शिवसेनाराष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे, अशी मोठी घोषणा राज ठाकरेंनी यावेळी केली.
 
या देशाचे भविष्य ठरवणार आहे राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कर भरतो.तेवढाच निधी वाट्याला यावा, अशी अपेक्षा आहे. येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे. अनेक निवडणुका येतील.विधानसभा निवडणुका येतील. त्यामध्ये काय होईल? मी इथेच गेल्यावर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे, असे सांगितले होते.
 
कोणती सोंगटी कुठे पडलीये माहिती नाही. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुणना अमेरीका आहे ना जपान आहे. या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे.त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केले पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. १० वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. तरुणांकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे,अशी माझी अपेक्षा आहे.
कार्यकर्त्यांना सूचना
या आधी २०१४ आणि २०१९ साली राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या नव्हत्या. त्यामुळे यंदा ते लोकसभेच्या रिंगणात असतील काय याबद्दल सर्वांना उत्सुकता होती.पण यंदाही आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नसून मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केले.
 
तसेच आता कोणताही विचार न करता कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनंतर, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भुमिकेचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विेशास ठेवत,विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी,भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा,शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.