जिल्ह्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा

By Raigad Times    10-Apr-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्हाभरात मंगळवारी गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील लहानमोठ्या शहरांमध्ये ढोल ताशाच्या गजरात शोभा यात्रा काढण्यात आल्या. मराठमोळा पारंपारिक पोषाख परिधान करुन मराठजन या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले.अलिबाग, पेण, पनवेल, महाड,कर्जत, रोह्यासह विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आली.
 
अलिबागमधील ब्राह्मणआळी येथील राम मंदिर येथून शोभायात्रेला सकाळी सुरुवात झाली. या शोभायात्रेसोबत वेगवेगळे ऐतिहासिक क्षणचित्रे, ढोल ताशांचा गजर, लेझीम, लाठीकाठीचे प्रदर्शन भरविण्यात आले.एक वेगळा उत्साह प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसून येत होता. छत्रपती शिवा महाराज चौक येथे शोभा यात्रेची सांगता झाली.
 
अनेक ठिकाणी तरुणांनी मोटारसायकल वरुन रॅली काढली. मंगळवारी (दि.९) नेरळ येथील चिंच आळीमध्ये असलेल्या श्री गुरुदत्त मंदिर येथून स्वागत यात्रेला सुरुवात झाली. या स्वागत यात्रेत असंख्य महिलांनी शोभायात्रेत भाग घेतला.ढोलकी, बाजा, भजनी मंडळ देखील सहभागरी झाले होते. महिलांनी मोठे रिंगण घेऊन लेझीमच्या तालावर ठेका घेतला होता. पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणी शोभा काढण्यात आल्या. एकंदरीत गुढीपाढवा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.