लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची पहिली यादी जाहीर

By Raigad Times    09-Mar-2024
Total Views |
 new delhi
 
नवीदिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपनंतर आता कॉंग्रेसनेही आज (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये खासदार राहुल गांधी, वरिष्ठ नेते शशी थरूर यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
 
कॉंग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत एकूण ३९ नेत्यांचा समावेश आहेत. याच पहिल्या यादीत राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल यांची नावे आहेत. राहुल गांधींना कॉंग्रेसने वायनाड या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. २०१९ साली त्यांनी वायनाड आणि अमेठी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती.
 
यावेळी मात्र ते पुन्हा एकदा अमेठीतून निवडणूक लढवणार का? हा प्रश्न अद्याप कायम आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना त्यांच्या तिरुअनंतपुरम या मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना कॉंग्रेसने सलग तिसर्‍यांदा याच मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
 
कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांचादेखील समावेश आहे.कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे बंधू डी के सुरेश यांनादेखील कॉंग्रेसने पहिल्याच यादीत तिकीट दिले आहे. ते बंगळुरू ग्रामीण या मतदारसंघातून निवडणूक लढवतील.