पोलादपुर गुरांच्या गोठ्याला आग; सहा गुरे, दगावली ; पळचिल उंबरकरवाडी येथील घटना

09 Mar 2024 15:15:13
 Poladpur
 
पोलादपूर | तालुक्यातील पळचिल जवळील उंबरकरवाडी येथील एका शेतकर्‍याच्या गोठ्याला भिषण आग लागली. या आगीत गुरांचा गोठा भस्मसात झाला असून, सहा गुरे आणि १५ कोंबडया दगावल्या आहेत. ६ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
 
पळचिल उंबरकरवाडी येथील गरीब शेतकरी बाबाजी धाऊ बर्गे यांच्या गुरांच्या गोठयाला वणव्यामुळे आग लागली आणि संपूर्ण वाडा जळून खाक झाला. यावेळी वाडयात बांधलेल्या सहा गुरांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत एक म्हैस, एक रेडा, दोन वासरे, दोन रेडकं अशी एकूण ६ जनावरे आणि १५ कोंबडया भस्मसात झाल्या.
 
वणव्यामुळे भडकलेल्या आगीमध्ये गुरांच्या वाडयाचे पत्रे, कौले,वासे, गुरांचा चारा व वैरण असे संपूर्ण जळून खाक झाले. या आगीमुळे बाबाजी धाऊ बर्गे या गरीब शेतकर्‍याचे अंदाजे ३ लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पंचनाम्याअंती प्राप्त झाली आहे.
 
आगीची माहिती मिळताच पोलीस पाटील आनंद निविलकर, माजी उपसरपंच उमेश मोरे व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेतली. तलाठी रितू सुदर्शने आणि कोतवाल अपूर्वा माने यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. वणव्यामुळे झालेल्या नुकसानीनंतर शासनाकडून त्यांना तातडीची मदत करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0