वरंध घाट वाहतुकीसाठी 2 महिने बंद राहणार ; कोकणातील प्रवाशांना पडणार वळसा

29 Mar 2024 16:12:13
 Mahad News
 
महाड । म्हाप्रळ भोर मार्गे पुणे येथे जाणार्‍या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला या मार्गावरील राजेवाडी फाटा ते रायगड जिल्हा हद्दी पर्यतच्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र वरंध घाटातील रुंदीकरणाचे काम व संरक्षक भिंतीचे काम चालु वाहतुकीमध्ये पावसाळ्यापुर्वी करणे अशक्य असल्याने हा मार्ग 1 एप्रिल पासून 31 मे पर्यत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी बजावले आहेत.
 
कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग बंद केल्याने येथील प्रवाशांना पुन्हा ताम्हाणे अथवा महाबळेश्वर मार्गे पुणे असा लांबचा खर्चिक वळसा घालावा लागणार आहे. पावसाळ्यात होणार्‍या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावर आल्याने, रस्ते व संरक्षक भिंती वाहून गेल्याने भोर मार्गे पुणे जाणारा मार्ग गेल्या दोन तीन वर्षांपासून पावसाळ्यात बंद ठेवण्यात येत आहे. या मार्गाच्या मजबुतीकरणाचे काम दोन वर्षा पासून सुरु आहे.
 
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी गतवर्षी राजेवाडी फाटा ते भोर मार्गे पुणे या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन हा रस्ता दुपदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केली होती त्यानुसार या रस्त्याचे कामही सुरु करण्यात आले.सद्यस्थितीत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे, परंतू साखळी पारमाची वाडी रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे, परंतू सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे.
 
सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापुर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही. दि. 1 एप्रिल ते 30 मे 2024 पर्यंत वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक बंद करण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी रायगड यांनी बजावले आहेत.
Powered By Sangraha 9.0