शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर ; मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी

By Raigad Times    29-Mar-2024
Total Views |
 MUMBAI
 
मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 8 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
त्यामुळे मावळमध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आणि बारणे एकमेकांविरोधात लढणार आहेत.दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, शिर्डी, बुलढाणा, हिंगोली, रामटेक, हातकणंगले आणि मावळ या मतदारसंघाचा समावेश आहे. महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघावरुन धुसफूस सुरु असताना शिंदे गटाकडून ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
 
या यादीत ज्या जागांवरुन वाद आहे त्यांचा समावेश टाळला आहे. शिंदे गटाने दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि मावळमधून श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
 
विशेष म्हणजे पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचा समावेश कऱण्यात आलेला नाही. कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देणं जवळपास निश्चित आहे. पण पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.दक्षिण मुंबईत ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने राहुल शेवाळेंची त्यांच्याशी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
 
तसंच शिर्डीत ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आमने-सामने असतील. बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्यात लढत होईल. हिंगोलीत नागेश पाटील-आष्टीकर आणि शिंदे गटाचे हेमंत पाटील एकमेकांना आव्हान देतील. याशिवाय मावळमध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आणि शिंदे गटाचे श्रीरंग बारणे एकमेकांविरोधात लढतील.