रोह्यात एटीएममध्ये बिघाड करुन चोरट्यांनी २४ लाख लांबविले

28 Mar 2024 16:50:19
 Roha
 
रोहा | रोह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये दोन अनोळखी चोरट्यांनी बिघाड करून तब्बल २४ लाख५२ हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली आहे. सलग ४० दिवस एटीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड करून या चोरट्यांनी इतक्या मोठ्या रक्कमेवर डल्ला मारल्याने संबधित बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे .
 
हा प्रकार समोर येताच बँक कर्मचार्‍यांना अक्षरशः घाम फुटले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.गजबजलेल्या लोकवस्तीत आणि शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या येथील स्टेट बँक ऑफ इंडिया रोहा शाखेच्या एटीएम मध्ये २१ जून २०२२ ते ३० जुलै २०२२ या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी एस. बी. आय. रोहायेथील ३ एटीएम मशीन मध्ये वेगवेगळ्या व्यक्तीचे डेबिट कार्ड वापरून एटीएम मशीनच्या पसे बाहेर येण्याच्या स्लॉट मध्ये काहीतरी वस्तू अडकवून मशीनला बाधा करून एटीएम मधील अकाउंट मध्ये प्रवेश करून वेगवेगळ्या व्यक्तीच्या अकाउंटचे डेबिट कार्ड वापरून त्या व्यक्तीचे अकाऊंटमधून तब्बल २४ लाख ५२ हजार रुपये लंपास केले.
 
या घटनेमुळे बँक ग्राहक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून बँक अधिकार्‍यांच्या तक्रारीनुसार रोहा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक विनोद वायंगणकर पुढील तपास करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0