रायगडात सिंचनाच्या चिखलात रुतलेला उमेदवार ; आज अजितदादांसोबत दिसतात, उद्या भाजपमध्ये पहिली उडी तटकरेच मारतील

रोहित पवार यांची मुरुड येथे खा. सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टिका

By Raigad Times    28-Mar-2024
Total Views |
murud
 
मुरुड । सिंचनाच्या चिखलात त्यांचा उमेेदवार रुतला आहे. गीते साहेबांकडेदेखील मोठे पद होते, त्यांनी भ्रष्टाचार नाही केला. पण, हे स्वहितासाठी काहीही करतील. त्यामुळे आज जरी ते अजित पवारांसोबत दिसत असले तरी, भाजपमध्ये जाणारे सुनील तटकरेच पहिले असतील, अशी टिका राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) युवा नेते रोहित पवार यांनी केली आहे.
 
शेकापने बुधवारी ( 27 मार्च ) मुरुड येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी रोहित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांची साथ सोडणार्या सुनील तटकरेंचा खरपूस समाचार घेतला. ’काय भरवसा नाही या लोकांचा’ अशा शब्दात त्यांनी तटकरेंना फटकारले आहे.
 
स्वाभिमान काय असतो ते महाराष्ट्राने, निष्ठा काय असते ती कोकणातील लोकांनी दाखवून दिले आहे. आपल्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बांधून पूर्ण व्हावा यासाठी घर गहाण ठेवणारे हिरोजी इंदुलकर यांचे उदाहरण देताना, आताचे नेते फक्त स्वत:चे घर भरण्याचा विचार करतात, अशा शब्दांत रोहित पवार यांनी तटकरेंना सुनावले.
 
कोकणामध्ये आल्यानंतर मला खूप भारी वाटते. एवढं सुंदर वातावरण असतानासुद्धा मला हे कळत नाही, इथले लोकप्रतिनिधी गुवाहाटीला कशाला गेले? का गेले मी काय वेगळं सांगणार नाही. तुम्हा सर्वांना याबाबत माहिती आहे. कोणाला पद हवे, कोणाला पैसे हवेत म्हणून गेले. त्यामुळे हे आश्वासन देऊ शकतात, फक्त खोकळे आश्वासन असेल, बाकी काय नसेल, असे रोहित म्हणाले.
 
शरद पवार साहेबांनी केंद्रामध्ये असताना आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत असताना, महाराष्ट्रामध्ये नेत्यांची फळी तयार केली. यांच्यामध्ये अनेक नेते होते, काही आमचे जवळचे घरातलेच होते. त्यामुळे कदाचित तुमचा एक कार्यकर्ता गेला असेल तर अजिबात नाराज होऊ नका.
 
आमचे घरातले पण गेले, आमचे मोठे नेते सुद्धा तिथे गेलेले आहे. पण एक तुम्हाला सांगतो जनता आपल्यासोबत आहे. आमच्यातले जे पलीकडे गेले, तेव्हा काय म्हणत होते 90 आमदार आणि नऊ खासदारकीची तिकीटे मिळणार. प्रत्यक्षात किती मिळाली? स्वाभिमान सोडला, महाराष्ट्र धर्माला सोडले आणि प्रतिगामी विचाराच्या बीजेपी बरोबर जाऊन बसले.
 
आता ते सांगतील आम्ही विकासासाठी गेलो. पण अजितदादा गटाने रायगडमध्ये जे उमेदवार दिलेत ते गाळात रुतलेले असल्याचा टोला रोहित पवार यांनी मारला आहे.पार्टी चोरांकडे घड्याळ गेले आहे. त्यावरची वेळ बदलून आता 4.20 अशी वेळ आहे. गीते साहेब यांच्याकडेसुद्धा मोठे पद होते. पण कधी त्यांनी भ्रष्टाचार केलेला हा आपण ऐकला नाही. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्याला इथे साहेबांच्या मागे उभे रहायचे आहे. निष्ठा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. लोकं चिडली आहेत.
 
मुलांच्या हाताला काम नाही, अधिवेशनामध्ये बोललो तर गप्प करतात.भाजपचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राची ताकद कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न झालेला आहे. आपलीच मुलं आणि मुली इंजिनियर झालेत. त्यांच्यासाठी आयएफसी सेंटर महत्वपूर्ण संधी होती. ते आयएफसी सेंटर भाजप सरकार आल्यानंतर गुजरातला नेले. असे अनेक मोठमोठे प्रोजेक्ट हे गुजरातला नेले. पुढच्या पिढीला काम कधी करायचं आणि कुठे करायचं असाही प्रश्न निर्माण झालेला आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातूनच स्वराज्य निर्माण केले होते. स्वाभिमान बाणवला आणि दिल्लीपुढे कुठल्याही परिस्थितीत झुकायचे नाही हे शिकवले आहे. त्यामुळे दिल्लीसमोर झुकायचे नाही, असे आवाहन रोहित पवार यांनी केले.
यावेळी शेकाप नेते आ. जंयत पाटील, आ. पंडीत पाटील यांनीही महायुतीवर तोंडसुख घेतले. यावेळी शेकाप नेते अ‍ॅड. आस्वाद पाटील, अनिल तटकरे, चित्रलेखा पाटील, प्रशांत नाईक, सतीश लोंढे, रविकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.