सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर ; तटकरे-गीतेंमध्ये पुन्हा एकदा होणार तगडी लढत

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून....

By Raigad Times    27-Mar-2024
Total Views |
mumbai
 
मुंबई । रायगड लोकसभेसाठी राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी (26 मार्च) त्यांच्या नावाची घोषणा केली. तटकरे हे रायगडमधून महायुतीचे उमेदवार असणार असल्याचे त्यांनी सांगितले. तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रायगडमधून तटकरे विरुध्द गीते अशी पुन्हा एकदा लढत होणार आहे.
 
लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याअगोदरच शिवसेना (ठाकरे गट) महाआघाडीचे उमेदवार म्हणून अनंत गीते यांच्या नावाची घोषणा झाली होती. सुनील तटकरे हे विद्यमान खासदार असल्यामुळे त्यांची उमेदवारी अपेक्षित असताना, रायगडात भाजपने त्यांच्याविरोधात रान उभे केले होते.
 
जिल्ह्यातील सर्वांत मोठा पक्ष भाजप आहे,त्यामुळे रायगड लोकसभेची जागा भाजप पर्यायाने धैर्यशील पाटील यांना मिळावी, अशी मागणी कार्यकर्ते करत होते.भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुनील तटकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे, तटकरेदेखील काही काळ गप्पच होते.
 
प्रत्येकालाच आपला पक्ष वाढावा,असे वाटत असते. कार्यकर्त्यांनी मागणी केली तर त्यात गैर काय? त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाबाबतची घोषणा पक्षाचे नेते करतील,महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचे काम करावे लागेल, अशी भूमिकाही त्यानंतर तटकरेंनी मांडली.
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक मंगळवारी पुण्यात पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी, रायगड लोकसभा निवडणुकीसाठी सुनील तटकरे यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले. यानंतर महायुतीचा उमेदवार सुनील तटकरे असणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे येत्या काळात रायगडमध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीते ही फाईट पुन्हा एकदा पाहता येणार आहे.
 
आमची आमदारांची बैठक झाली. आम्ही एकत्र चर्चा करुन महायुतीच्या 48 जागांबद्दल महाराष्ट्रात कुणी कुठे जागा लढवायच्या त्याचे 80 टक्के काम झाले आहे. आता मी सांगतो की 99 टक्के जागावाटपाचे काम फायनल झाले आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत. आज मी पहिली जागा जाहीर करतो आहे.
 
रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवतील, ही माहिती अजित पवार
यांनी दिली. मुख्य पक्ष आणि घटक पक्ष मिळून 48 जागा लढवत आहोत. शिवाजीराव अढळराव यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे,असेही त्यांनी सांगितले.पाच वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या तेव्हा लोकसभेच्या 48 जागा होत्या.
 
त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस युतीत लढले आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो होतो. कारण नसताना गैरसमज पसरवले गेले. 23 आणि 18 जागा भाजपा आणि शिवसेनेने 2019 ला जिंकल्या होत्या.त्यानंतर आमची चर्चा झाली आहे. अंतिम घोषणा आम्ही 28 मार्चला करणार आहोत आणि जागा जाहीर करणार आहोत, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
 
महायुती म्हणून आमचे 48 उमेदवार उभे राहणार आहेत अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली. लोकसभा निवडणुकीत काय रणनीती असेल, या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.बुधवारीही यासंदर्भात बैठक होणार आहे असेही सुनील तटकरेंनी सांगितले.