रिकाम्या खुर्च्या बघून आ. थोरवे संतापले; नगरसेवकांना दम

By Raigad Times    27-Mar-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली । मावळ लोकसभा निवडणुकीसंदर्भात आयोजित बैठकीला गर्दीच नसल्याचे पाहून आमदार महेंद्र थोरवे संतापल्याचे दिसून आले. फक्त ठेकेदारी करू नका, पक्षसंघटना वाढविण्यासाठी काम करा. आप्पा बारणे यांना खासदार करायचे आहे, लोकसभेला मतदान कमी झाल्यास विद्यमान नगरसेवकांवर फुल्ली मारीन, असा दमच आ. थोरवे यांनी पदाधिकार्‍यांना
दिला आहे.
 
खोपोली शहरातील महाराजा मंगल कार्यालयाच्या सभागृहात शिवसेना (शिंदे गटाची) बैठक आ. महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख पंकज पाटील, संतोष विचारे, खोपोली शहरप्रमुख संदीप पाटील, शहर संपर्कप्रमुख हरिश काळे, संघटक तात्या रिठे, उपशहरप्रमुख दिनेश थोरवे, महिला शहर संघटिका प्रिया जाधव, माजी नगरसेवक मोहन औसरमल, राजू गायकवाड, अमोल जाधव, नीलम चोरघे, तालुका संघटीका रेश्मा आंग्रे,काव्या खोपकर उपस्थित होते.
 
लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मतदार संघात कुठे मागे राहता काम नाही. शिवसेनेचा खासदार आहे म्हणून आपण काम केले पाहिजे. नवीन लोक आलेले आहेत, त्यांना मानसन्मान द्या,गाफील राहू नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच 1 ते 30 एप्रिलपर्यंतचे नियोजन देतो,त्याप्रमाणे केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवा, असेही आ.थोरवे म्हणाले.सगळ्या माझ्या भगिनी आहेत,मी सगळ्यांना सन्मान देत आलोय.
 
ती गेली पण मी प्रचंड अस्वस्थ झालो. माझ्या डोळ्यात अश्रू आले, असे सुरेखा खेडकर यांचे नाव न घेता त्यांनी सांगितले. जे गेलेत त्यांना उद्याचे निवडणुकीत परत सामावून घेऊ.त्यांचे गैरसमज दूर करण्याचे काम मी करेन. संघटनेला वेळ द्या,असे सांगतानाच, लोकसभेची निवडणूक ही आपली विधानसभेची रंगीत तालीम आहे; आपण कुठे कमी पडतो याचा अभ्यास करा.आपापसात मतभेद ठेवू नका, असेही थोरवे म्हणाले.
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला पदाधिकार्‍यांची तुरळक उपस्थिती पाहून आ.थोरवे कमालीचे संतापले
होते. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महिला आघाडी नियोजनबध्द काम करून आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी मेहनत घेवू.
 
यादरम्यान आमच्या महिला आघाडीला जी जबाबदारी द्याल, ती योग्य पण सांभाळून महिलांना सिद्ध करू,असे अश्वासन शहर संघटीका प्रिया जाधव यांनी देत जे गेलेत त्यांचा विचार करु नका, पुन्हा कामाला लागा असेही आवाहन केले.एक बहिण गेली तरी आम्ही तुमच्या बहिणी आहोत. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन निलीमा चोरगे यांनी दिले. एक दोन पदाधिकारी गेले तरी पक्षसंघटना संपत नसते, नव्या कार्यकर्त्यांना पदे देवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शहर प्रमुख संदीप पाटील म्हणाले