महाड पंचायत समितीची जुनी इमारत धोकादायक! साबांचे दुर्लक्ष

By Raigad Times    23-Mar-2024
Total Views |
 mahad
 
महाड | महाड पंचायत समिती च्या जुन्या इमारतीला बांधून ५० वर्षे झाली असून या इमारतीचा वापर बंद करून ५ ते ६ वर्षे होऊनही ही इमारत आजही धोकादायक अवस्थेत उभी आहे.या इमारतीच्या परिसरात तालुक्यातील जनतेचा दररोज मोठ्या संख्येने वावर असतो. त्यामुळे जर दिवसा ही इमारत अचानक कोसळली तर नाहक जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.
 
या इमारतीसह शिक्षण विभागाची इमारत व गॅरेजच्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल दोन वर्षापुर्वीच देण्यात आला आहे. त्यानंतर ही इमारत पाडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागाकडून होणारा विलंब पाहता हे खाते एखादी दुर्घटना घडल्या नंतर जागे होणार का ? असा सवाल जनतेकडून होत आहे.
 
महाड पंचायत समितीची जुनी मुख्य इमारत, त्याशेजारील शिक्षण विभागाची इमारत व गॅरेजचे बांधकाम ५३ वर्षापुर्वी केले आहे. दि.९ मे १९८२ ला खासदार चंद्रशेखर यांचे हस्ते या इमारतीचे उद्घाटन होऊन त्यामध्ये कामकाज सुरु करण्यात आले. सन २०१५ मध्ये महाड पंचायत समितीची नवीन वास्तु उभी राहील्या नंतर जुन्या इमारतीचा वापर बंद करण्यात आला.
 
५० वर्षाहून जास्त जुनी इमारत आजमितीस धोकादायक अवस्थेत असून स्ट्रक्चर ऑडिटमध्येही ती धोकादायक असल्याचा अहवाल २०२२ व २०२४ मध्ये केलेल्या पाहणीत दिला आहे.महाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारताच गटविकास अधिककारी श्रीम स्मिता पाटील यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये ही इमारत पाडण्याचा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांचेकडे दिला आहे. मात्र दोन महिन्या नंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे बांधकाम खाते एखादी दुर्घटना घडण्याची वाट पहात आहे का असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे