होळीसाठी उरण आगारातून प्रवाशांसाठी जादा बसेस ; कोकणवासीय उत्कर्ष संस्थेच्या मागणीला यश

By Raigad Times    23-Mar-2024
Total Views |
 Uran
 
उरण | चाकरमान्यांसाठी होळी हा महत्वाचा सण आहे. कोकणातील गावोगावी ‘शिमगा’ उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या सणासाठी मुंबई, नवी मुंबईतील चाकरमानी हमखास गावी दाखल होतात. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, कोकणी माणसाचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी उरण एसटी आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
 
कोकणवासीय उत्कर्ष संस्थेने यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत, उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी व उरणमध्ये परत येण्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी संस्थेचे सचिव रविंद्र चव्हाण यांनी उरण बस आगार तसेच मुख्य कार्यालय असलेल्या मुंबई कार्यालय मध्येही पत्रव्यवहार केला होता.
 
उरण ते रत्नागिरी, उरण ते खेड, उरण ते देवरुख, उरण ते कणकवली, उरण ते गणपतीपुळे या मार्गावर जादा बसेस सोडण्याची मागणी उरण बस आगार व्यवस्थापक अमोल दराडे यांच्याकडे या पत्राद्वारे करण्यात आली होती. आगारव्यवस्थापक अमोल दराडे यांनी या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
 
होळी सणासाठी २० मार्चपासून रात्री ८ वाजता उरण आगार ते गणपती पुळे या मार्गावर बस सोडण्यात येत आहे. कोकणात जाण्यासाठी व कोकणातून परत उरणमध्ये येण्याचीही व्यवस्था बसद्वारे करण्यात आली आहे. तरी प्रवासी वर्गाने या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकणवासीय उत्कर्ष संस्था व उरण बस आगारतर्फे करण्यात आले आहे.