लोकसभेचा विडा, महायुतीमध्ये तिढा ?

By Raigad Times    22-Mar-2024
Total Views |
 Mumbai
 
मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या भाजप कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४४ जागा जिंकण्याचे लक्ष भाजपने ठेवले आहे. यासाठी आधी शिवसेना फोडण्यात आली. राष्ट्रवादीला रिकामे केले गेले...तरीही भाजप नेतृत्व समाधानी नाही.
 
आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत बैठकांवर बैठका सुरु आहेत.मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबई आणि शिर्डी जागा मिळणार का याबाबत चर्चा सुरु होती. दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेवर शिवसेनेचे खासदार गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.
 
यावेळी यापैकी नेमकी कोणती जागा मनसेला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गुरुवारी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरु असताना महायुतीतील महत्त्वाचे नेते अजित पवार मात्र उपस्थित नव्हते.महायुती लढत असलेल्या जागांपैकी भाजपने दुसर्‍या यादीत महाराष्ट्रातील २० जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीचं जागा वाटप मनसेची एंट्री झाल्यानंतर जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
 
आगामी काळात महायुतीचा प्रचार, लोकसभा निवडणुकीची रणनीती यासंदर्भात चर्चा आजच्या बैठकीत होऊ शकते. राज ठाकरे महायुतीत आल्यास उद्धव ठाकरेंकडून होणार्‍या हल्ल्यांना ते प्रत्युत्तर देऊ शकतात. याशिवाय महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर देखील ते आक्रमकपणे टीका करतील.
 
राज ठाकरेंचा मनसे पक्ष महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह बैठक पार पडल्यानंतर राज यांनी आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या बातम्या वाहीन्यांचे प्रतिनिधी देत आहेत.
 
भाजप नेत्यांनीही त्यांचे स्वागतच केले आहे. मात्र राज ठाकरे युतीमध्ये येत असल्याच्या बातम्यांनी शिंदेगट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कालवाकालव सुरु आहे. आधीच या दोन पक्षांमध्ये जागा वाटपावरुन वॉर सुरु आहे. त्यात राज यांना जागा सोडायची वेळ आल्यास बलीदान द्यायचा कोणी हा प्र्रश्‍न आहे?अर्थात दिल्लीचा विडा उचलायचा असेल तर जागांंचा तिडा सोडवणे महायुतीला क्रमप्राप्तच आहे. फक्त तो सुटणार कधी? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.