महिला ठरवणार रायगडचा खासदार ! लोकसभा मतदारसंघात ८ लाख १३ हजार पुरुष ; ८ लाख ४० हजार महिला मतदार

By Raigad Times    18-Mar-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | देशात लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. मुंबईला लागून असलेल्या रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघात पुरूष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने रायगडचा खासदार कोण होणार हे महिला मतदार ठरवणार आहेत.रायगड जिल्हयात २३ लाख १६ हजार ५१५ मतदार आहेत.
 
त्यात पुरूष मतदारांची संख्या ११ लाख ७८ हजार ५५ इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या ११ लाख ३८ हजार ३७८ इतकी आहे.शिवाय रायगडमध्ये ८२ तृतीयपंथी मतदार आहेत. रायगड जिल्हयात विधानसभेचे एकूण सात मतदार संघ आहेत. यात अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, महाड आणि श्रीवर्धन या मतदार संघांचा समावेश आहे.महिला मतदारांच्या हाती नाडी रायगड जिल्हयातील सातपैकी कर्जत, उरण आणि पनवेल या तीन विधानसभा मतदार संघांचा मावळ लोकसभा मतदार संघात समावेश होतो.
उर्वरीत अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन तसेच रत्नागिरी जिल्हयातील दापोली व गुहागर असे एकूण सहा विधानसभा मतदार संघ मिळून रायगड लोकसभा मतदार संघ आहे. रायगड लोकसभा मतदार संघात एकूण १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार आहेत. यात पुरूष मतदारांची संख्या ८ लाख १३ हजार ५१५ आहे तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख ४० हजार ४१६ आहे. शिवाय ४ तृतीय पंथी मतदार आहेत. पुरूष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या २६ हजार ९०१ ने अधिक आहे.
जिल्हयात ११ हजार २८२ दिव्यांग मतदार आहेत तर ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ३७ हजार ७३६ मतदार आहेत. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्प तसेच व्हीलचेअरची व्यवसथा असेल तर ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या मतदारांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्हयात २४ हजार १७७ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील आहेत.
रायगड जिल्हयात २ हजार ६९४ मतदान केंद्र असून त्यातील केवळ ६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. तर रायगड लोकसभा मतदार संघात २ हजार १८५ मतदान केंद्र आहेत. जिल्हयात निवडणूक आयोगाने ७ हजार ५२ मतदान यंत्रे , ४ हजार ४५ कंट्रोल युनिट आणि ४ हजार २२२ व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत.
एकीही महिलेला आतापर्यंत लोकसभेची उमेदवारी नाही
रायगड लोकसभा मतदारसंघात यावेळी पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. मात्र आतापर्यंत जिल्ह्यातील प्रमुख तिन राजकिय पक्षांनी एकदाही महिला उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी दिलेली नाही. यावेळीदेखील महाआघाडीकडून अनंत गीते उभे राहणार आहेत, युतीकडून सुनिल तटकरे यांचे नाव आहे. मध्येच त्यांची कन्या अदिती तटकरे यांचे नावदेखील विविध वृत्तपत्रातून चर्चीत आहे. प्रत्यक्षात महायुती कोणाला मैदानात उतरवतेय हे पाहण्यासारखे असणार आहे.