महाड येथील ब्ल्यूजेट कंपनीतील भीषण आगीचा अहवाल प्रतीक्षेतच ! दोन अधिकार्‍यांवर कारवाई, तपास सुरूच

By Raigad Times    18-Mar-2024
Total Views |
 mahad
 
महाड | महाड नव्हे तर रायगड जिल्ह्याच्या औद्योगिक वसाहतींच्या इतिहासामधील सर्वात भीषण आग म्हणून इतिहासात नोंद झालेल्या महाड वसाहतीमधील ब्ल्यूजेट कंपनीतील अग्नी प्रलयास चार महिने उलटून गेल्यानंतरही शासनाकडून या संदर्भात आवश्यक असणारा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही.
 
३ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या भीषण अग्निप्रलयांमध्ये या कारखान्यातील ११ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते, हे अग्नी तांडव एवढे भयंकर होते की यामध्ये या सर्व कामगारांचा परिचय शास्त्रीय पद्धतीने तपासणी केल्यानंतरच होऊ शकला.
रायगडचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी घटनेनंतर बारा तासातच या ठिकाणी भेट देऊन या संदर्भातील चौकशीची जबाबदारी महाडचे प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा केली होती. चौकशी दरम्यान फॅक्टरी इन्स्पेक्टर, प्रदूषण मंडळ, पोलीस प्रशासन यांच्याकडून या संदर्भातील अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र या संदर्भात प्रांताधिकारी कार्यालयाकडून आजपर्यंत कोणतीही अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.
महाड तालुका इंटक संघटनेचे अध्यक्ष सुहास दिविलकर यांनी आपण या अपघाताप्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयाकडे सविस्तर अहवाल द्यावा यासाठी पत्र देणार असल्याचे सांगितले. कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना तो झाला नसल्याने न्यायालयात या संदर्भात दाद मागणार असल्याचे नमूद केले.
या अपघाता संदर्भात प्रांताधिकारी यावर कोणती भूमिका घेतात याकडे कामगार वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.