लोधिवलीचा तलाठी सजा चार्ज चौक सजाकडे द्या; ग्रामस्थ

By Raigad Times    18-Mar-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | लोधिवलीचा तलाठी सजाचा चार्ज, चौक किंवा तुपगाव सजाकडे देण्यात यावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. लोधिवलीचा प्रभारी चार्ज दुर बसलेल्या लोहोप तलाठी यांचेकडे देण्यात आलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
 
मौजे नढाळ, लोधिवली, सारंग, वयाळ येथील ग्रामस्थ असुन या चारही गावची तलाठी सजा स्वतंत्र अशी मौजे लोधिवली म्हणुन महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेली आहे.
 
परंतु तलाठी सजा लोधिवली करीता स्वतंत्र असा तलाठी यांची नेमणुक न झाल्याने मागील १ वर्षापासुन तलाठी सजा लोहोप यांचेकडे प्रभारी चार्ज दिलेला आहे. चारही गावाच्या हद्दीत आदिवासी समाजाच्या जमिन मिळकती आहेत. तसेच इतर व्यक्तींच्या जमिन मिळकती आहेत.
 
तर अर्जदार यांना सातबारे उतारे व इतर पंचनामे, जबाब या करीता मौजे लोहोप या ठिकाणी जावे लागते. सदर सजा ही नढाळ लोधिवली या गावांपासुन दुर आहे. तसेच आदिवासी समाजातील व्यक्तीकडे स्वत:चे वाहन नसल्याने त्यांना रिक्षा करून तलाठी सजा लोहोप या ठिकाणी जावे लागते. यात लोकांचा वेळ व पैसा अधिक खर्च होतो.चारही गावची बाजारपेठ ही चौक आहे.
 
तसेच चौक या ठिकाणी मंडळ अधिकारी यांचादेखील कार्यालय आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी चौक यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या तलाठी सजा तुपगांव किंवा चौक या ठिकाणी तलाठी सजा लोधिवली यांचा प्रभारी चार्ज दिल्यास लोकांस सातबारे उतारे व इतर कागदपत्र काढणे सोपे होईल. तसेच लोकांचा वेळ व पैसा वाचेल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऍड. सचिन चाळके यांनी केली आहे. तसे निवेदन तहसीलदार आयुब तांबोळी यांच्याकडे केली आहे. यावेळी लोधिवली उपसरपंच समीर दळवी, संतोष भोसले, सागर नवघने, राजेंद्र जमदाडे आदी उपस्थित होते.