देशामध्ये जन्मतः दरवर्षी ६ टक्के बालकांना असतो जन्मदोष ! रायगडात ‘राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण’ मोहीम सुरु

By Raigad Times    16-Mar-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग | जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील ‘राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण’ महिन्याचा ऑनलाईन शुभारंभ गुरुवारी (१४ मार्च) करण्यात आला. दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक जन्म दोष दिन पाळला जातो व मार्च महिना हा राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिना म्हणून साजरा केला जातो.
 
जन्मदोष जनजागरण महिन्यामध्ये सर्व जन्म दोषाबद्दल जागरूकता आणि काळजीसह उपचार पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. यावर्षीची थीम ‘ब्रेकींग बॅरिअर्स इनक्ल्युसीव्ह सपोर्ट फॉर चिल्ड्रेन विथ बर्थ डिफेक्ट’ अशी आहे. जगभरात दरवर्षी सहा टक्के बालक जन्मतःच दोष घेऊन जन्माला येतात.
 
जन्म दोष हा अनुवांशिक जसे मातेचा मधुमेह आणि लट्ठपणा, मातेचे वय, व्हायरल इन्फेक्शन आणि मातृ स्थिती जसे कांजिण्या, रुबेला, झिका, पर्यावरणीय आणि औषधे यांच्याशी संबंधित असतो. आपल्या भावी पिढीवर जन्मजात दोषांचा काय परिणाम होतो, याची जाणीव नसल्याने केंद्रीय मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राष्ट्रीय जन्मदोष जनजागरण महिना मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
 
जन्मदोष जनजागरण महिन्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाच्यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील इतर आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता एसएनसीयु बालरोग तज्ञ डॉ.सागर खेदू यांनी जन्मजात व्यंग ओळखण्याबाबतचे प्रशिक्षण घेतले.
 
यामध्ये त्यांनी क्लब फूट, हृयरोग आजार, स्नायू विकृती, डाऊन सिंड्रोम, फाटलेले ओठ व टाळू, जन्मजात बहिरेपणा व जन्मजात मोतीबिंदू असे जन्मजात व्यंग कसे ओळखावे, याबाबत प्रशिक्षण दिले.या मोहिमेदरम्यान जन्म दोष आढळून आलेल्या बालकांना जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामध्ये संदर्भित करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी सूचना दिल्या.
 
यावेळी अधिसेविका गायत्री म्हात्रे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका नंदिनी चव्हाण, आरबीएसके समन्वयक सुनिल चव्हाण, डीईआयसी व्यवस्थापक गणेश भोसले तसेच आरबीएसके व डीईआयसीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.