नेरळ ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या कामबंद आंदोलनाला यश; दोन महिन्यांचा पगार मिळाला

By Raigad Times    15-Mar-2024
Total Views |
 karjat 
 
कर्जत । 9 महिन्यांचे वेतन थकल्याने कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीमधील कर्मचार्‍यांनी सोमवार (11 मार्च) पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. आज (15 मार्च) ग्रामपंचायतीने कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा केले. कार्यालयीन कर्मचारी वगळता अन्य 87 कर्मचार्‍यांना एकूण 34 लाखांचे वेतन अदा करण्यात आले.
 
उर्वरित मागण्यांसाठी उद्या गटविकास अधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे.नेरळ ग्रामपंचायतीमधील कामगार महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेच्या माध्यमातून थकीत पगारासाठी कामबंद आंदोलनाला बसले आहेत. 11 मार्चपासून गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन सुरु आहे.
 
कार्यालयीन कामगार वगळता अन्य सर्व कामगारांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने, त्याचा फटका ग्रामपंचायतीच्या कामांना बसत आहे.मनसेचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी यांनी कामगारांच्या कामबंद आंदोलनाला नेरळ येथे येऊन पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस तसेच आझाद हिंद पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे.शनिवारीही कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही कामगार संघटनेने जाहीर केले आहे.