40 हजारांची लाच घेताना महसूल कर्मचारी जाळ्यात

By Raigad Times    15-Mar-2024
Total Views |
 panvel 1
 
पनवेल । भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये करण्यासाठी लाच मागणार्‍या पनवेल तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यकला 40 हजाराची लाच घेताना नवी मुबई लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.तक्रारदार जयदास गायकर यांची गिरवले येथे स्वतःच्या मालकीची शेतजमीन आहे.
 
जयदास यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने शेतजमिनी भोगवटादार वर्ग 2 मधील जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये वर्ग करण्यात यावा असा अर्ज केला होता. मात्र तक्रारी अर्ज करून देखील तीन महिने कारवाई झाली नाही.जयदास गायकर यांनी तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे या संदर्भात तब्बल सहा वेळा भेट घेतली.
 
त्या वेळी हे काम करण्यासाठी काही तरी द्यावे लागेल असे सांगत 1 लाख 20 हजाराची मागणी केली होती. पैशाची ही मागणी झाल्यानंतर याबाबतची तक्रार नवी मुबई लाच लुचपत विभागाला केली. लाच लुचपत विभागाने पहाणी केल्यानंतर, गोरे यांनी मला फक्त 40 हजार द्या अशी मागणी केली. त्यानुसार पैसे देताना महसूल सहाय्यक किरण गोरे याला नवी मुंबई लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.