‘शरद पवारांचे नाव आणि फोटो वापरायचा नाही’ ;सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले

By Raigad Times    15-Mar-2024
Total Views |
 new dehli
 
नवीदिल्ली । निवडणूक प्रचारात शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर करु नका अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला सुनावले आहे. तसेच यासंबंधी लेखी हमी देण्यास सांगण्यात आले आहे. शरद पवार गटाकडूनच यासंबंधी तक्रार करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
 
शरद पवार गटाने अजित पवार गटाविरोधात तक्रार केली होती. निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आवाहन करताना अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या नावाचा आणि फोटोचा वापर केला जात असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले होते. यावर सुप्रीम कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं.
 
जेव्हा निवडणूक जवळ येतात तेव्हा तुम्हाला शरद पवारांची गरज वाटते. जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा मात्र तुम्हाला गरज वाटत नाही. आता तुमची एक वेगळी ओळख आहे. तुम्ही मतदारांमध्ये जाताना याच नव्या ओळखीने गेलं पाहिजे अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे. तसेच कोर्टाने अजित पवार गटाला 2 दिवसांत लेखी हमी देण्याचा आदेश दिला आहे. 19 मार्चला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
 
दरम्यान, अजित पवार यांनी आपण शरद पवारांचे नाव, फोटो वापरत नसल्याचा दावा केला आहे. आम्ही त्यांचे फोटो वापरले, पण त्यांनी सांगितले जर माझा फोटो वापरला तर कारवाई करावी लागेल. आम्ही सुसंस्कृत म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे फोटो वापरतो. व्यक्ती ह्यात असल्यावर त्याच्या संमतीने फोटो वापरावा लागतो. आम्ही त्यांचे फोटो वापरत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.