सागरी मार्गावरील ४ हजार नारळाची रोपे करपली

By Raigad Times    13-Mar-2024
Total Views |
 Uran
 
उरण | सिडकोने उरणला जोडणार्‍या द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी महामार्गावर जवळपास १ कोटी रुपये खर्च करून ४ हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र सिडकोच्या दुर्लक्षामुळे ही रोपे पाण्याविना करपू लागली आहेत. त्यातच अज्ञात समाजकंटकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या गवताला लावलेल्या आगीत करपून गेली आहेत.
 
सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील रस्त्यांवर विविध प्रकारची झाडे लावण्याचा संकल्प शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून हाती घेतला आहे.
 
त्या धर्तीवर सिडकोने पागोटे - भेंडखळ - करंजा बंदर या द्रोणागिरी नोड परिसरातील नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सागरी रस्त्यांवर जवळपास एक कोटी रुपये खर्च करून नारळाची झाडे लावली आहेत. पावसामुळे या झाडांना पाण्याची आवश्यकता नव्हती, मात्र सध्या प्रचंड ऊन पडू लागले आहे. या उन्हाच्या तडाख्यात ही झाडे पाण्याविना कोमजली आहेत.