शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा; विधीमंडळाच्या लॉबीत कर्जतचे आ.महेंद्र थोरवेे आणि मंत्री दादा भुसे भिडले

By Raigad Times    01-Mar-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आज विधीमंडळाच्या लॉबीत आपापसात भिडल्याचे वृत्त आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे या दोघांमध्ये ही धक्काबुक्की झाली. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले आणि मंत्री शंभुराजे देसाई यांनी मधस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या कामावरुन हा वाद झाला असल्याचे बोलले जात आहे.
 
शिंदे गटाचे आमदार आपापसात भिडल्याने विधीमंडळाच्या लॅाबीत खळबळ माजली आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर शिंदे गटाकडून सारवासारव सुरु आहे. असे काही झालेच नसल्याचा दावा शंभुराजे देसाई यांनी केला आहे. विधिमंडळात राडा झाल्याचा काय पुरावा आहे? तिथे कोणताही कॅमेरा नाही. मग राडा झाला असे कोण म्हणत? असा उलटप्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला. आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली नाही. चर्चा करताना दोघांचा आवाज वाढला असे, शंभुराज देसाई म्हणाले.
 
तर दुसरीकडे ‘आता ही सुरुवात आहे. पिक्चर अजून बाकी आहे. निवडणुका होईपर्यंत अजून काय काय होतंय हे पहा’, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले. या सरकारमध्ये कोणाला शिस्त नसल्याचेही ते म्हणाले. ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये होते, तर शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातील आमदार त्यांच्यासोबत होते.
 
एकनाथ शिंदे हे सभागृहात गेल्यानंतर महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यात लॉबीमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली. हा वाद नेमका कोणत्या कारणांनी झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या वादामुळे एकाच पक्षातील दोन नेते आमनेसामने आल्याने, राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
 
दरम्यान, महायुती सरकारमध्ये एकाच पक्षातील दोन आमदारांमध्ये अशाप्रकराची धक्काबुक्की होण्याची ही पहिलीच घटना आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. त्यात आता या घटनेमुळे राजकीय वर्तुळात वातावरण आणखीनच तापले आहे.