नगरपंचायत विषय समित्यांचे बिनविरोध वाटप

माणगांवमध्ये राजिकय पक्षांचे गळ्यात गळे

By Raigad Times    08-Feb-2024
Total Views |
 mangoan
 
उतेखोल / माणगांव । माणगांव नगरपंचायत विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडली.विशेष म्हणजे, कॉगे्रस वगळता शिवसेना शिंदेगट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट,भाजप गट, असे सर्वच राजकिय पक्षांनी गळ्यात गळे घातले आहेत.
 
पदाधिकार्‍यांचे हे प्रेम पाहून माणगावकरही भारावून गेले आहेत.नगर पंचायतीत झालेल्या या आघाडीत शिवसेना शिंदेगट, शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट, भाजप गट, असे सगळेच आपली गटा- तटाची सारी भांडणे तंटे,मतभेद विसरुन कारभार करणार आहेत.
 
आता यांना कोणी विरोधकच उरले नाहीत. नगरपंचायत निवडणुकीत हिच सर्व मंडळी एकमेका विरुध्द लढत, उनीधुणी काढतात. आता एकत्र येऊन कसा कारभार करणार अशी चर्चा सुरु आहे. माणगांव नगरपंचायत सत्ताधारी पक्षाचा दोन वर्षाचा यशस्वी कालावधी संपलेला आहे.
 
बुधवार 7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी विषय समिती सभापती पदाच्या निवडणुक बिनविरोध पार पडल्या. माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी पिठासिन अधिकारी म्हणून विषय समिती निवडणूक प्रक्रियेचे काम पाहिले. नगरसेवक प्रशांत अशोक साबळे यांची पाणीपुरवठा, सामाजिक न्याय व शिक्षण समिती सभापती पदी नगरसेविका शर्मिला शोभन सुर्वे यांची स्वच्छता, आरोग्य व क्रीडा समिती सभापती तर नगरसेविका सुविधा संतोष खैरे यांची महिला, बालकल्याण व युवक कल्याण सभापती पदी वर्णी लागली आहे. तर राजेश गोकुळदास मेहता हे उपनगराध्यक्ष तथा पदसिद्ध सभापती बांधकाम, नियोजन व दिवाबत्ती समिती पदी कायम असणार आहेत.